Villegers Boycott Families in Jharkhand: स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजात अत्यंत अन्यायकारक अशा जातीय उतरंडीमुळे एका मोठ्या समूहावर व्यापक प्रमाणावर अन्याय व अत्याचार झाल्याचे ऐतिहासिक दाखले आजदेखील सापडतात. कालांतराने इथे झालेल्या सामाजिक चळवळी व परिणामी सुधारणांमुळे ही परिस्थिती बऱ्याच अंशी सुधारण्यास मदत झाली. पण आता पुन्हा एकदा तशाच स्वरूपाच्या भीषण प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याचं एक उदाहरण समोर आलं आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारला म्हणून झारखंडमधल्या एका गावानं चक्क चार कुटुंबांना वाळीत टाकलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना गावातील तलावातून पाणी घेण्यास किंवा आसपासच्या वनातून लाकूड गोळा कण्यासदेखील मज्जाव करण्यात आला आहे.
…आणि पोलिसांनी केली मध्यस्थी!
झारखंडच्या सिंगभूम जिल्ह्यातल्या जगन्नाथपूर ब्लॉकमध्ये हा प्रकार घडला. या ब्लॉकमधील हलदी पोखर गावात ख्रिश्चन धर्म स्वीकारला म्हणून गावकऱ्यांनी चार कुटुंबांना वाळीत टाकलं. या कुटुंबांना गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली. तिथून पाणी घेण्यास मज्जाव करण्यात आला. त्याचप्रमाणे आसपासच्या वनातून लाकूड व इतर गोष्टी गोळा करण्यासही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे गावातील परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचं दिसून आलं. शेवटी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
गावात आधी तीन कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यांना गावकऱ्यांचा विरोध चालूच होता. मात्र, नुकतंच चौथ्या कुटुंबानंदेखील ख्रिश्चन धर्म स्वीकराल्यानंतर गावाचा मुंडा (प्रमुख) आणि इतर पदाधिकाऱ्यांनी संबंधित चारही कुटुंबांना वाळीत टाकण्याचा निर्णय जाहीर केला. शनिवारी ३१ जानेवारी रोजी हा सगळा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करून गावातील पदाधिकाऱ्यांना समज दिली. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
गावकऱ्यांनी का घातली बंदी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गावात प्रामुख्याने सारना समुदायाची वस्ती आहे. याच समुदायातील चार कुटुंबांनी नुकताच ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मात्र, आपला धर्म, संस्कृती व पारंपारिक श्रद्धांना जपण्यासाठी चार कुटुंबांना वाळीत टाकण्याचा निर्णय घेतल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे धर्मांतरं झाल्यास त्याचा परिणाम गावाची दैवता, संस्कृती आणि परंपरेनुसार चालत आलेल्या सामाजिक रचनेवर होऊ शकतो, असा ग्रामस्थांचा दावा होता.
या भागातील कुमारदुंगी पोलीस स्थानकाचे प्रमुख रणजीत ओराअन यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी गावाला भेट देऊन गावकरी व संबंधित कुटुंबांची एकत्रित बैठक बोलावली. “आम्ही तिथे जाऊन गावकऱ्यांशी स्वत: बोललो. संपूर्ण गावाला बोलावलं होतं. गावचा मुंडादेखील तिथे होता. सर्कल ऑफिसरही होते. प्रत्येकाला आम्ही कल्पना दिली की अशाप्रकारे सामाजिक बहिष्कार टाकणं कायद्याने गुन्हा आहे”, असं ओराअन म्हणाले.
असा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, प्रसंगी गुन्हा देखील दाखल केला जाईल असं यावेळी पोलिसांनी गावकऱ्यांना बजावलं. धार्मिक आधारावर भेदभाव करणं बेकायदेशीर व घटनाविरोधी असल्याचं गावकऱ्यांना स्पष्ट करण्यात आलं असून परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.
सार्वत्रिक बंदी हटली, पण तलावावर जाण्यास मज्जाव!
दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतरदेखील ग्रामस्थांनी संबंधित कुटुंबीयांना फक्त त्यांच्या घरासमोरच्या विहिरीतलं पाणी घेण्यास परवानगी दिली असून गावातील तलावातून पाणी घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

