Varanasi Crime News: ‘तू मेरी नहीं तो किसी की नहीं’, असा हिंदी संवाद आण चित्रपटातून ऐकला असेल. एकतर्फी प्रेमातून प्रियकराने काहीतरी गुन्हेगारी कृत्य केल्याचे यातून प्रतीत होते. मात्र एका प्रेयसीने हा डायलॉग मारत प्रियकराचे घर उध्वस्त केले आहे. प्रत्येकालाच अचंबित करणारे हे प्रकरण घडले आहे उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये. आपल्या प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर चिडलेल्या प्रेयसीने थेट प्रियकराच्या घरात घुसून नववधूचा गळा चिरला. यानंतर प्रेयसी तिथेच “जो माझा नाही, तो कुणाचाही नाही”, असे मोठमोठ्याने ओरडू लागली.
वाराणसीच्या छोलापूर गावात सदर धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेयसीने नववधूचा गळ्यावर वार केल्यानंतर घरातील लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेली नववधूचे प्राण वाचले असून आता तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे गावात मोठा थरकाप उडाला. प्रेयसीने केलेल्या या हल्ल्यामुळे प्रियकराचे कुटुंबीय चांगलेच भयभीत झाले आहेत.
पोलिसांनी आता आरोपी प्रेयसीला अटक केली आहे. अटक केलेल्या प्रेयसीचे नाव प्रिया असल्याचे फ्री प्रेस जर्नलने त्यांच्या वृत्तात सांगितले आहे. तर तिच्या प्रियकराचे नाव बबलू अन्सारी असल्याचे सांगितले जात आहे.
धर्मामुळे लग्न होऊ शकले नाही
या प्रकरणात प्रियाच्या आईने बबलूच्या विरोधातही तक्रार दाखल केली आहे. प्रियावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी प्रियाची चौकशी केल्यानंतर तिने या कृत्यामागील कारण सांगितले. प्रिया आणि बबलू हे तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. बबलूने लग्नाचे वचन देऊन माझ्यावर अनेकदा बलात्कार केला, असा आरोप प्रियाने केला आहे. त्यामुळे प्रियाच्या आईने त्याच्यावर बलात्काराची तक्रार दाखल केली.
हे ही वाचा >> Shakti Bill Update: बदलापूर प्रकरणानंतर शक्ती कायद्याची पुन्हा चर्चा; बलात्काऱ्यांना कडक शिक्षा देणारा कायदा का रखडला?
प्रियाने चौकशीत असेही कबूल केले की, तिला बबलूशी लग्न करायचे होते. मात्र धर्म वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या लग्नात अडचणी येत होत्या. त्यातच बबलूने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर चिडलेल्या प्रियाने बबलूच्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला.