एपी, सीॲटल : प्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारे पहिले अमेरिकी नागरिक, जिम व्हिटेकर यांचे मंगळवारी वॉशिंग्टनमधील पोर्ट टाउनसेंड येथील राहत्या घरी निधन झाले आहे. ते ९७ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली.
‘घर असो, डोंगर असो वा समुद्र, त्यांनी आपल्या आसपासच्या लोकांबरोबर साहस, आनंद आणि आशावाद प्रसृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा जिव्हाळा, नम्रता आणि निसर्गाच्या शक्तीवर असलेला विश्वास यामुळे पृथ्वीची आणि एकमेकांची काळजी घेण्याचा एक शाश्वत वारसा मागे राहिला आहे,’ असे त्यांचे पुत्र लीफ व्हिटेकर यांनी ई-मेल निवेदनात म्हटले आहे.
सर एडमंड हिलेरी आणि तेनसिंग नोर्गे यांच्या ऐतिहासिक चढाईनंतर दहा वर्षांनी, १९६३ मध्ये व्हिटेकर यांनी नवांग गोम्बु यांच्यासह एव्हरेस्ट सर केला होता. या पराक्रमाने अमेरिकेत गिर्यारोहणाची ओढ आणि एक मोठी बाजारपेठ निर्माण करण्यास मदत झाली. या कामगिरीमुळे कधीकाळी लाजाळू असलेले व्हिटेकर एका रात्रीत प्रसिद्ध झाले. ते अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकले आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी त्यांची मागणी वाढली.
अमेरिकन किरकोळ विक्री आणि बाह्य मनोरंजनात्मक सेवा पुरवणार्या ‘आरईआय’चे पहिले पूर्णवेळ कर्मचारी आणि नंतर त्याचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून काम व्हिटेकर यांना काम पाहिले होते. ते १९५५ पासून ‘आरईआय’मध्ये कार्यरत होते. त्यांच्या एव्हरेस्ट मोहिमेनंतर या कंपनीची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि पुढे १९७१ ते १९७९ या काळात त्यांनी या व्यवसायाचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात कंपनीची सभासद संख्या अडीच लाखांवरून नऊ लाखांहून अधिक झाली.
