उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरदार पटेल आणि मोहम्मद अली जिन्ना यांची तुलना केल्याबद्दल अखिलेश यादव यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. सरदार पटेल आणि जिन्ना यांची तुलना होऊ शकत नाही. पटेल भारताचं एकीकरण करणारे नेते असून जिन्ना भारताचे तुकडे करणारे नेते असल्याचं त्यांनी शनिवारी सांगितलं.

उत्तरप्रदेशात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. शनिवारी औरेया भागातल्या एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरदार पटेल आणि जिन्ना यांची बरोबरी करणाऱ्यांनी आता सावध राहावे. येत्या निवडणुकीत जनता अशा लोकांना योग्य उत्तर देईल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी ५०० पेक्षा जास्त संस्थानांचं विलिनीकरण करुन भारत एकसंध केला.

हेही वाचा – अखिलेश यांच्या जिनांबाबतच्या वक्तव्यावरून वाद

योगी पुढे म्हणाले, आधी राज्यात सतत दंगली होत असायच्या. पण आता दंगलखोरांच्या सात पिढ्या दंगली करण्याचा विचार करत नाहीत. राज्यात आत्तापर्यंत ७० वर्षांमध्ये १२ वैद्यकीय महाविद्यालयं बांधण्यात आली. पण भाजपा आता ७५ जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार आहे. आधीच्या सरकारने सणासुदीला छोट्या व्यापाऱ्यांना लुटले जायचे, पण आता व्यापारीसुद्धा चांगल्या प्रकारे व्यापार करत आहे. मी आता उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आणलं आहे. त्यामुळे आता कोणीही दंगली करायला धजावणार नाहीत. आम्ही राज्यातल्या सर्वांचा विकास केला आहे. कोणालाही उपेक्षित ठेवलेलं नाही.

काय म्हणाले होते अखिलेश यादव?

३१ ऑक्टोबरच्या दिवशी हरदोई इथल्या सभेत बोलताना अखिलेश यादव म्हणाले होते की, सरदार पटेल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु आणि बॅरिस्टर जिन्ना हे सगळे एकाच शिक्षणसंस्थेत शिकून बॅरिस्टर झाले होते. त्यांना कितीही संघर्ष करावा लागला तरी ते मागे हटले नाहीत. जे आज देशाविषयी बोलत आहे ते जात धर्माच्या आधारे तुमच्या आमच्यात फूट पाडण्याचं काम करत आहेत. जाती धर्मात विभागलो गेलो तर आपल्या देशाचं काय होईल?