TRAI Orders Reliance Jio To Stop Discriminatory Tariff Practice: भारताची दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ने (TRAI) देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला (Reliance Jio) मोठा दणका दिला आहे. जिओकडून राबवल्या जाणाऱ्या विशिष्ट टॅरिफ योजना या पारदर्शकतेचे उल्लंघन करणाऱ्या आणि ग्राहकांमध्ये भेदभाव करणाऱ्या असल्याचे ताशेरे ओढत त्या तात्काळ थांबवण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
जिओने काही एन्ट्री-लेव्हल प्रीपेड प्लॅन्स, जे दररोज १ जीबी डेटा देतात, ते सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध न ठेवता केवळ विशिष्ट ठिकाणी मर्यादित ठेवले होते. ट्रायने केलेल्या चौकशीत असे समोर आले की, २४ रूपयांचा आणि १९९ रूपयांचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STVs) केवळ ‘जिओ स्टोअर्स’मध्ये उपलब्ध होते. तर, २०९ रूपयांचा प्लॅन केवळ ‘माय जिओ’ (MyJio) ॲपवर उपलब्ध होता.
याशिवाय, जिओफोन (JioPhone) आणि जिओ भारत (JioBharat) वापरकर्त्यांसाठी असलेले विशेष प्लॅन्स हे केवळ त्या उपकरणांपुरते मर्यादित ठेवणे, हे Non-discrimination तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे ट्रायने म्हटले आहे.
१४ एप्रिलपर्यंतची मुदत
नियामकाने रिलायन्स जिओला या आदेशांचे पालन करण्यासाठी १४ एप्रिल २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत जिओला दोन मुख्य गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या म्हणजे-
१. २४९, १९९ आणि २०९ रूपयांच्या टॅरिफ प्लॅनसह सर्व टॅरिफ प्लॅन्स रिटेल स्टोअर्स, कस्टमर केअर, वेबसाइट आणि ॲप अशा सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून द्यावे लागतील.
२. जिओ भारत आणि जिओ फोनसाठी असलेले विशेष प्लॅन्स इतर सर्व उपकरणांसाठी (Devices) देखील उपलब्ध होतील अशा पद्धतीने त्यांची पुनर्रचना करावी लागेल.
“टॅरिफची उपलब्धता ही एकमेकांशी जोडलेली बाब आहे. ग्राहकांना एका प्लॅनसाठी एका ठिकाणी आणि दुसऱ्या प्लॅनसाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पाडणे, हे दूरसंचार टॅरिफ आदेश १९९९ च्या विरोधात आहे.”
— ट्राय (TRAI)

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी धोक्यात?
ट्रायने इशारा दिला आहे की, विशिष्ट उपकरणांवर आधारित टॅरिफ योजनांमुळे ग्राहकांच्या ‘मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी’ (MNP) अधिकारावर गदा येत आहे. ग्राहकांना एखादा स्वस्त प्लॅन हवा असेल, तर त्यांना विशिष्ट कंपनीचे उपकरण खरेदी करण्यास भाग पाडले जाते, जे भेदभावपूर्ण आहे. यामुळे ग्राहकांना इतर कंपनीत जाण्याचा पर्याय मर्यादित होतो.
जिओने यावर बचाव करताना म्हटले होते की, हे प्लॅन्स ‘फर्स्ट टाईम रिचार्ज’शी संबंधित आहेत. मात्र, ट्रायने हा युक्तिवाद फेटाळून लावत स्पष्ट केले की, हे नियम केवळ सिम कार्ड घेण्यापुरते मर्यादित असू शकतात, टॅरिफ प्लॅन्सच्या उपलब्धतेसाठी नाही. या निर्णयामुळे आता जिओच्या ग्राहकांना सर्व प्लॅन्स सर्वत्र सहज उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
