“माझ्या मुलीचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग”; JNU च्या माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदच्या वडिलांचा आरोप

जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं पत्र

दिल्लीमधील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची म्हणजेच जेएनयूची माजी विद्यार्थी नेता असणाऱ्या शेहला रशीद यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप केले आहे. शेहला यांचे वडील अब्दुल रशिद शोरा यांनी आपल्या मुलीचा देशाविरोधातील कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा केला आहे. तसेच शेहलापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही शोरा यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील पत्रच शोरा यांना जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आपली पत्नी जुबैदा, मोठी मुलगी आसमा रशीद आणि पोलीस खात्यामधील एक कर्मचारीही शेहलासोबत या देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप या पत्रामध्ये शोरा यांनी केला आहे. तसेच जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट पक्षामध्ये सहभागी होण्यापूर्वी शेहलाने एका उद्योजकांकडून तीन कोटी घेतल्याचा दावाही शोरा यांनी केला आहे.

आपल्या जीवाला धोका असून आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशा विषयासंदर्भातील तीन पाणी पत्र शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी शेहलावर गंभीर आरोप करतानाच आपल्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केली आहे. मागील वर्षीच सप्टेंबर महिन्यात शेहला यांच्याविरोधात एका ट्विट प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लष्कराने नागरिकांचा छळ करून काश्मीर खोऱ्यातील लोकांची घरे लुटल्याचा आरोप शेहला यांनी ट्विटरवरुन केला होता. आता थेट शेहला यांच्या वडिलांनीच तिच्यावर गंभीर आरोप केल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.


शेहला म्हणतात…

शेहला यांनी आपल्या वडिलांनी पाठवलेल्या या पत्रासंदर्भातील वृत्त समोर आल्यानंतर सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शेहला यांनी एक पोस्ट ट्विटवरुन शेअर केली आहे. “तुमच्यापैकी अनेकांनी माझ्या वडिलांनी माझ्याबरोबर माझी आणि बहिणीवर केलेल्या आरोपांचा व्हिडीओ पाहिला असेल. अगदी थोड्यात सांगायचं झाल्यास माझे वडील म्हणजे महिलांना मारहाण करणारे, शिव्या देणारे आणि निराश व्यक्ती आहे. आम्ही त्यांच्या या वागण्याविरोधात आवाज उठवला आणि त्यांनी नंतर प्रसिद्धीसाठी हा स्टंट केला आहे,” असं शेहला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याचसोबत शेहला यांनी अन्य काही ट्विटही केले असून अगदी मला समज आल्यापासून माझे वडील आमच्याशी अशा पद्धतीने वागायचे असं नमूद केलं आहे. अगदी जुन्या पत्रांपासून अनेक पुरावे देत शेहला यांनी वडिलांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. वडिलांनी केलेले आरोप हे आधारहीन आणि घृणास्पद असल्याचा घणाघातही शेहला यांनी केला आहे. १७ नोव्हेंबरपासून वडिलांना घरामध्ये प्रवेश करण्यास न्यायालयाने बंदी घातलेल्या आदेशाची प्रतही शेहला यांनी ट्विट केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jk jnu ex student leader shehla rashid father dgp letter daughter charges police crime scsg

ताज्या बातम्या