जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. ४० सैनिकांनी कमांडिंग ऑफिसरसह पोलिसांवरच कथितरीत्या हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आता कर्नल आणि एका मेजरसह काही लष्करी जवानांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिसांनी १७ राष्ट्रीय रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरसह लष्कराच्या काही जवानांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात घुसून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचा आरोप या ४० जवानांवर करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

वृत्तानुसार, ही घटना बुधवारी किश्तवाड जिल्ह्यातील अथोली पोलीस ठाण्यात घडली. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्याच्या मालकीचं एक वाहन जप्त करत कारवाई केली होती. मात्र, या कारवाईनंतर हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, एफआयआरनुसार, स्टेशन हाऊस ऑफिसर इन्स्पेक्टर अमृत कोटाच हे एका बैठकीला उपस्थित असताना त्यांना पोलीस ठाण्यात हिंसक घटना घडल्याची माहिती मिळाली. या संपूर्ण घटनेबाबत अमृत कोटाच यांनी आरोप केला की, “१७ राष्ट्रीय रायफल्स कॅम्पमधील सुमारे ३० ते ४० जवानांनी पोलीस ठाण्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंत ओलांडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी या ३० ते ४० जवानांकडे लाठ्या, काठ्या, लोखंडी सळ्या आणि इतर शस्त्र होती. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर पूर्व-नियोजित असा हा हल्ला केला असल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.”

“लष्करी जवानांनी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हा हल्ला केला असून सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं आहे. तसेच यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या झटापटीदरम्यान शारीरिक हल्ला करण्यात आला आणि आपला गणवेश फाडला गेला आहे”, असा आरोप अमृत कोटाच यांनी केला आहे. ” दरम्यान, एफआयआरमध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, उप-विभागीय पोलीस अधिकारी, विशेष पोलीस अधिकारी आणि इतर अनेक पोलीस कर्मचारी या घटनेत जखमी झाले आहेत.