जम्मू-काश्मीरच्या शोपियान सेक्टरमध्ये मंगळवारी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका स्थानिक महिलेला हकनाक जीव गमवावा लागला. येथील बतमुरान गावातील एका घरात तीन दहशतवादी लपून बसले होते. याचा सुगावा लागल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी हा परिसर खाली करत कारवाईला सुरूवात केली. सोमवारी पहाटे ५.३० वाजता सुरू झालेली ही चकमक दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० पर्यंत सुरू होती. सकाळी साधारण ११च्या सुमारास घटनास्थळापासून ५०० मीटरच्या अंतरावर असणाऱ्या घराच्या खिडकीतून रुबिना जान ही महिला चकमक पाहत होती. मात्र, यावेळी अचानकपणे या घराच्या दिशेने गोळ्यांचा वर्षाव झाला. यापैकी एका गोळीने रुबिनाच्या छातीचा वेध घेतला. गोळी लागल्यानंतर रुबिना थेट जमिनीवर पडली. त्यावेळी तिचे कुटुंबीयही त्याच खोलीत बसले होते. मात्र, त्यांच्यापैकी कोणालाही इजा झाली नाही. रुबिना ही आपल्या आजारी काकांची देखभाल करण्यासाठी आपल्या माहेरी आली होती. तिला ११ महिन्यांची लहान मुलगीही आहे. रुबिनाला गोळी लागल्यानंतर तिला लगेचच रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर बतमुरान गावात तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी लष्करी अधिकाऱ्यांनी या चकमकीची माहिती दिली तेव्हा या चकमकीत आठ नागरिक व दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी यावेळी रुबिनाच्या मृत्यूचा उल्लेख केला नव्हता. या संपूर्ण लष्करी कारवाईदरम्यान काही गावकऱ्यांनी भारतीय सैन्याला विरोध केला. या लोकांकडून भारतीय सैन्यावर दगडफेक करण्यात आली. त्यांना रोखण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या पेलेट गन्सच्या माऱ्यात ८ नागरिक जखमी झाले होते.

रुबिनाच्या अंत्यदर्शनाच्यावेळीही ‘जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले’ अशी कुजबुज ऐकायला मिळत होती. आम्ही सर्वजण खोलीत बसलो होतो. त्यामुळे सर्व गोळ्या भिंतीतून आल्या असत्या तर, आम्हा सर्वांचा मृत्यू झाला असता. आम्हाला जाणुनबुजून लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप रुबिनाच्या नातेवाईकांनी केला. रुबिनाच्या घराच्या भितींवर आणि खिडकीवर आठ गोळ्यांच्या खुणा आहेत. यापैकी एक खिडकीतून आत आलेली गोळी रुबिनाला लागली होती.