जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अफजल गुरूच्या फाशीविरोधात कार्यक्रम घेऊन देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणात अटक केलेला विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याचे सहकारी उमर खालिद व अनिर्बन भट्टाचार्य रात्री उशीरा दिल्ली पोलिसांना शरण गेले. अटक टाळता येईल असा कोणताही दिलासा न्यायालयाने दिला नसल्याने दोघांनी पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही शरणागती पत्करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.

कन्हैय्या कुमारच्या अटकेनंतर उमर आणि त्याचे सहकारी काही दिवस बेपत्ता होते. त्यानंतर ते सोमवारी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये परतले.  दिल्ली पोलिसांना विद्यापीठात प्रवेश करून अटक करण्याची परवानगी नसल्याने पोलिसांनी उमर आणि त्याच्या सहकाऱयांना शरण येण्याचे आवाहन केले होते. मात्र, उमर आणि सहकाऱयांनी पोलिसांच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर अटकपूर्व जामिनाचा अंतरिम आदेश जारी करण्यासाठी उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य पोलिसांना शरण आले. दरम्यान, शरणागती पत्करताना संरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने ठरवले आहे.

विद्यापीठाच्या अहवालात पुरावे

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अफजल गुरूच्या फाशीविरोधातील कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्याकुमार याच्यासह इतर आठ विद्यार्थ्यांविरोधात विद्यापीठाच्या चौकशी अहवालात पुरावे आहेत, असे दिल्ली पोलिसांना दिसून आले आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यापीठाच्याच अहवालातील तपशिलाचा आधार घेत अहवाल तयार केला आहे, पण दिल्ली पोलिसांना घोषणाबाजी नेमकी कुणी केली हे सांगण्यात अपयश आले असून एकही साक्षीदार उभा करता आलेला नाही.  सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना काल अहवालाची देवाण-घेवाण करण्यास सांगितले होते. त्यानुसार विद्यापीठाचा चौकशी अहवाल पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांना त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस किंवा विद्यापीठ कर्मचारी यांच्यापैकी कुणीही  साक्षीदार सापडलेला नाही.