जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील एका प्राध्यापकावर तब्बल १० विद्यार्थिनींनी लैंगिक शोषणाचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारींनंतर विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीने (ICC) प्राध्यापकाविरुद्ध अधिकृत चौकशी सुरू केली आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

घरी बोलावून अश्लील वर्तन अन् वर्गात लैंगिक टिप्पणी

साधारण महिन्याभरापूर्वी या प्रकरणी पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती. प्राध्यापकाने कॅम्पसमधील आपल्या निवासस्थानी विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलन (गेट-टुगेदर) आयोजित केले होते. या दरम्यान प्राध्यापकाने अश्लील स्पर्श आणि अनुचित वर्तन केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनींनी केला आहे. याशिवाय, दैनंदिन व्याख्यानांदरम्यान वर्गातही प्राध्यापक अश्लील आणि द्विअर्थी टिप्पण्या करत असल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला आहे.

माजी विद्यार्थ्यांचा पाठिंबा, प्रशासनाचे मौन

पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर विद्यापीठातील इतर माजी विद्यार्थीही पीडितांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी या प्राध्यापकाच्या आक्षेपार्ह वर्तनावर तीव्र चिंता व्यक्त करत, भूतकाळातही अशाच घटना घडल्याचा दावा केला आहे. सध्या अंतर्गत तक्रार समिती या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. मात्र, या खळबळजनक प्रकरणावर जेएनयू प्रशासन किंवा कुलगुरू कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया जारी करण्यात आलेली नाही. तसेच विद्यार्थी संघटनेनेही यावर अधिकृत वक्तव्य देणे टाळले आहे.