नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलुगुरू शांतिश्री धुलिपुडी पंडित यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेने (जेएनयूएसयू) काढलेल्या मोर्चामुळे गुरुवारी विद्यापीठ आवारात प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्यान, विद्यापीठात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

‘जेएनयूएसयू’ने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास मोर्चा काढला. ‘जेएनयू’मधील साबरमती हॉस्टेलपासून ल्युटन्स दिल्लीतील केंद्रीय शिक्षण मंत्रालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ‘जेएनयूएसयू’ने जाहीर केले होते. पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू करत हा मोर्चा ‘जेएनयू’च्या प्रवेशद्वारावर अडवला. डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी ‘जेएनयूएसयू’च्या पदाधिकाऱ्यांसह काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

कुलगुरुंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विद्यार्थी संघटना आणि प्राध्यापकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. हे विधान जातीय अन्यायाकडे दुर्लक्ष करणारे व समतेसाठीच्या विविध तरतुदी अमान्य करणारे असल्याचा आरोपही करण्यात आला. सोमवारी डाव्या विचारांच्या ‘जेएनयूएसयू’चे समर्थक व हिंदुत्ववादी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने काही विद्यार्थी नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला. हे गुन्हे मागे घेतले जावेत, विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करावे व कुलगुरू शांतिश्री यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी मोर्चा काढण्यात आला.

कुलगुरुंचे विधान काय? कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी पंडित यांनी एका पॉडकास्टमध्ये जातव्यवस्था आणि ‘पीडित मानसिकता’ यावर केलेल्या वक्तव्यामुळे जेएनयूमध्ये नवा वाद पेटला आहे. या मुलाखतीत त्यांनी दलित समाजाच्या संघर्षांची तुलना अमेरिकेतील कृष्णवर्णीय समुदायाशी करत, ‘सतत स्वतःला पीडित म्हणवून घेऊन प्रगती होत नाही. जसे कृष्णवर्णीयांबाबत झाले, तसेच येथे दलितांबाबत घडले,’ असे विधान केले होते. कुलगुरू शांतिश्री यांच्या विधानानंतर आठवडाभर ‘जेएनयू’मध्ये तणावाचे वातावरण आहे.