नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अभाविप तसेच डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये रविवारी पुन्हा संघर्ष झाला. यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. याबाबत दोन्ही बाजूंकडून दावे केले जात आहेत. विद्यापीठाच्या कावेरी वसतीगृह खानावळीत रविवारी मांसाहारी जेवण तयार केले जात होते. त्याला मज्जाव करण्याचा प्रयत्न अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे, तर अन्य एका आरोपानुसार याच वसतीगृहात रामनवमीपूजेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत दोन्ही बाजूंकडील सहा विद्यार्थी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.