दिल्लीमधील दंगलींशी संबंधित गुन्ह्यांमध्ये न्यायालीयन कोठडीत असलेला जेएनयुचा विद्यार्थी शरजील इमामने आपल्यावर तिहार जेलमध्ये हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. इतर कैद्यांनी मिळून आपल्यावर हल्ला केल्याचा शरजीलचा दावा आहे. तसंच आपल्या कारागृहाची तपासणी होत असताना दहशतवादी म्हणण्यात आलं असाही आरोप त्याने केला आहे.

शरजीलने कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी त्याने अनेक सुनावणींदरम्यान कारागृहातील कर्मचाऱ्याकडून आपल्यासोबत भेदभाव केला जात असल्याचं म्हटलं होतं.

शरजील इमामच्या वकिलांनी कारागृह प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यासाटी कोर्टात याचिका दाखल केली आहे. मारहाण तसंच बेकायदेशीरपणे तपासणी करण्यासंबंधी यात उल्लेख असून त्याचं संरक्षण करण्यासाठी पावलं उचलावीत अशी मागणी आहे. याशिवाय याचिकेत ३० जूनला रात्री घटना घडली तेव्हाचे ७.१५ ते ८.२० पर्यंत सीसीटीव्ही चित्रण जतन करुन ठेवावं अशी मागणीही करण्यात आली आहे.

सोमवारी शरजीलला दिल्ली दंगलीच्या प्रकरणात कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी आपली भेट झाली असता त्याने हा घटनाक्रम सांगितला अशी माहिती वकिलांनी दिली. यानंतर कोर्टाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली असून १४ जुलैला सुनावणी होणार आहे. यावेळी कारागृह प्रशासन अहवाल सादर करण्याची अपेक्षा असल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.

शरजीलच्या वतीने दाखल याचिकेत सांगण्यात आलं आहे की, ‘३० जूनला सहाय्यक अधीक्षक ८ ते ९ कैद्यांसोबत तपासणी करण्याच्या नावाखाली आपल्या कोठडीत आले आणि या बेकायदेशीर तपासणीदरम्यान त्यांनी पुस्तकं, कपडे फेकून दिले. मारहाणदेखील करण्यात आली आणि रोखण्यात आलं असता दहशतवादी, राष्ट्रविरोधी असा उल्लेख करण्यात आला’.

शरजीलने सहाय्यक अधीक्षकांना हे सर्व थांबवण्यासाठी वारंवार विनवणी केली, पण त्यांनी काहीच केलं नाही. यानंतर इतर कैद्यांकडून आपल्याला मारहाण झाली असंही शरजीलने सांगितलं आहे.

कारगृह प्रशासन कैद्यांसोबत मिळून कोठडीची तपासणी करु शकत नाही. सहाय्यक अधीक्षक बेकायदेशीर कृत्यात सहभागी होते असं याचिकेत नमूद आहे. आपल्या कोठडीत कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट सापडली नसल्याचंही शरजीलने सांगितलं आहे.

कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला याची माहिती मिळाली असून याची चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. ज्या अधिकारी आणि कैद्यांवर आरोप आहेत त्यासंबंधी आम्ही तपास करत आहोत. तसंच सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याची विनंती आम्हाला आली असून त्याप्रमाणे आम्ही करु असंही ते म्हणाले आहेत.