दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कायमचं चर्चेत असते. त्यात गेल्या आठवड्यापासून जेएनयू देशातील चर्चेच्या केंद्रभागी आले आहे. काही तोंड बांधलेल्या गुंडांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थी, प्राध्यापकांवर हल्ला केला. याचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. या प्रकरणात केंद्र सरकारवर आरोपही केले जात असून, २००५मधील घटना चर्चेत आली आहे. त्यावेळी जेएनयूतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवले. त्यात विद्यार्थ्यांनी विद्यापीठानं नोटीस पाठवली. पण, पंतप्रधान कार्यालयानं हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नका, असं विद्यापीठालाच सुनावलं होतं.

जेएनयूवरून देशभरात सुरू असलेल्या वाद-प्रतिवादाच्या शाब्दिक युद्धात जेएनयूतील माजी विद्यार्थी उमर खालीदनं एक ट्विट केलं आहे. खालीदनं २००५मधील प्रसंग सांगून तेव्हाची आणि सध्याच्या परिस्थितीविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.

उमर खालिदचं ट्विट काय?

“२००५मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जेएनयूमध्ये आर्थिक धोरणांवरून काळे झेंडे दाखवण्यात आले होते. ही खुप मोठी बातमी झाली होती. प्रशासनानं तात्काळ विद्यार्थ्यांना नोटीस पाठवली. पण, पुढच्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयानं यात हस्तक्षेप केला आणि विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, कारण आंदोलन करणे त्यांचा मुलभूत अधिकार आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी काळे झेंडे दाखवून घोषणा देत होते, त्यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भाषण सुरू केलं. ‘तुम्ही जे म्हणत आहात त्याच्याशी मी सहमत होऊ शकत नाही, पण तुमच्या बोलण्याच्या अधिकारांची मी मरेपर्यंत रक्षा करेल,’ असं सिंग म्हणाले होते,” असं ट्विट खालिदनं केलं आहे.त्याचबरोबर तेव्हा आणि आता असा म्हणत दोन्ही सरकारच्या भूमिकांची त्यानं तुलनाही केली आहे.

आणखी वाचा – जेएनयूच्या आंदोलनादरम्यान महिलेने घेतला पोलीस अधिकाऱ्याच्या हाताचा चावा

उमर खालिदचं ट्विट अभिनेत्री स्वरा भास्करनं रिट्विट केलं आहे. तसेच “इंडिया आणि न्यू इंडियामध्ये हाच फरक होता,” असं मतही व्यक्त केलं आहे.