Jodhpur two sisters suicide case updates : राजस्थानमध्ये गेले अनेक वर्षे दोन बहि‍णींवर सामूहिक अत्याचार केले जात होते. या छळाला कंटाळून एक महिन्याच्या फरकाने दोन्ही बहि‍णींनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून न्याय न मिळाल्याने या दोन्ही बहि‍णींनी आयुष्य संपवल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले.

ग्रामीण जोधपूरमधील दोन बहिणींच्या मृत्यूमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, पोलिसांच्या निष्काळजीपणावर आणि आरोपींवर कारवाई न केल्याबद्दल गंभीर आरोप केले जात आहेत. पीडितांच्या वडिलांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींना कडक शिक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर अनेकांची चौकशी सुरू आहे.

छळाला कंटाळून मोठ्या बहिणीची आत्महत्या

लहान बहिणीने ११ एप्रिल रोजी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या मोठ्या बहिणीला स्थानिक ई-मित्र सेवा केंद्र चालक महिपाल याने जाळ्यात ओढले होते आणि तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. तिने आपल्या तक्रारीत महिपालसह शिवराज, गोपाळ, विजाराम, दिनेश, मनोज आणि पुखराज अशा एकूण आठ जणांची नावे घेतली होती. या सर्वांवर तिच्या मोठ्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आणि धमक्या दिल्याचा आरोप तिने केला होता. महिपाल आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे चार वर्षे तिचे शोषण केले आणि ब्लॅकमेल करून सातत्याने पैशांची वसुली केली, असे तिने तक्रारीत म्हटले होते. या छळाला कंटाळून मोठ्या बहिणीने २० मार्च रोजी आत्महत्या केली होती. न्याय न मिळाल्यास आपणही आपले जीवन संपवू, असा इशारा लहान बहिणीने पोलिसांना आधीच दिला होता. तिच्या तक्रारीवरून एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला, परंतु त्यानंतर महिनाभर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप आहे.

पाण्याच्या टाकीवर चढून दुसऱ्या बहिणीने केली आत्महत्या

हा भयानक छळ इथेच थांबला नाही. मोठ्या बहिणीच्या आत्महत्येने खचलेल्या या तरुणीलाच आरोपींनी लक्ष्य केले. बहिणीचे व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन आरोपींनी तिच्यावरही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला. एफआयआर दाखल झाल्यानंतरही आरोपी तिला उघडपणे धमक्या देत होते आणि ‘पोलीस आपले काहीच करू शकत नाही’ अशी बढाई मारत होते, असा आरोप तिने केला होता. शुक्रवारी आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या लहान बहिणीने पाण्याच्या टाकीवर चढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर तिने विष प्राशन केले, हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

तीव्र संताप आणि आक्रोश

या घटनेमुळे राजपूत समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृतदेह ठेवण्यात आलेल्या एमडीएम (MDM) रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर नागरिकांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला. सुरुवातीच्या वाद आणि विरोधानंतर, पीडितेच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी संमती दिली आहे. मारवाड राजपूत सोसायटीचे अध्यक्ष हनुमान सिंग खांगटा यांनी आरोप केला आहे की, पोलीस संपूर्ण तपासात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांच्या याच अपयशामुळे दोन्ही बहिणींना आपले प्राण गमवावे लागले, असे ते म्हणाले. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय कारवाई करावी, अशी मागणी समाजाने केली आहे. जोधपूरचे पोलीस अधीक्षक (SP) पी. डी. नित्या यांनी सांगितले की, महिपाल आणि इतर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.