सोशल मीडियावर २१ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारे ज्योतिषी आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरला सरपंच निवडणुकीत पराभवला सामोरं जावं लागलं. गावातल्या १६०० मतांपैकी ओमप्रकाश बिश्नोई यांना फक्त ३३ मतं मिळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारी लोकप्रियता खरी मानावी की गाव पातळीवर लोकांशी असलेला कनेक्ट खरा यावर चर्चा सुरू झाली आहे.

ओमप्रकाश हे चेहरा बघून तसंच कुंडली पाहून भविष्य सांगतात. ते युट्यूबरही आहेत. राजस्थानमधल्या जोधपूर जिल्ह्यातल्या ओशियान परिसरात ते राहतात. इंदो की धानी २ या गावातील सरपंचपदाची निवडणूक त्यांनी लढवली.

सोशल मीडियावर दखलप्राप्त प्रेक्षक फॉलोअर्स असूनही बिश्नोई यांना अवघी ३३ मतं मिळाली. बिश्नोई यांचे इन्स्टाग्रामवर १४ लाख तर फेसबुकवर २ लाख फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर त्यांचे ५.५ लाख सबस्क्रायबर्स आहेत. लोकांचं भविष्य सांगणाऱ्या माणसाला स्वत:चा एवढा मोठा पराभव वर्तवता आला नाही अशी चर्चा गावी रंगली आहे.

पराभवानंतर ओमप्रकाश बिश्नोई यांनी त्यांना मत दिलेल्या मतदाराचे आभार मानले. निवडणूक लढवल्या, आपल्या बाजूने मतदान व्हावं यासाठी दारु किंवा तत्सम कशाचीही लालूच दाखवली नाही याचं समाधान असेल असं ते म्हणाले.