एपी, टोक्यो : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर तैवानचे संरक्षण करण्याचे ओझे ‘आणखी मोठे’ असल्याचे सांगून; चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका लष्करी हस्तक्षेप करेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी दिला.

  तैवान सरकारच्या समर्थनार्थ अमेरिकेच्या कुठल्याही अध्यक्षाने गेल्या दशकभरात केलेले हे सर्वात जोरदार वक्तव्य होते.

चीनने आक्रमण केल्यास तैवानच्या संरक्षणासाठी लष्कर आणण्यास तुम्ही इच्छुक आहात काय, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला असता बायडेन यांनी ‘होय’ असे उत्तर दिले. ‘आम्ही तसे वचन दिले आहे,’ असे ते म्हणाले.

तैवानशी कुठलाही संरक्षणविषयक करार नसलेला अमेरिका सहसा तैवानला अशा प्रकारची सुरक्षेची स्पष्ट हमी देणे टाळतो. चीनने आक्रमण केल्यास आपण कुठवर पाऊल पुढे टाकू याबाबत ‘व्यूहात्मक संदिग्धतेचे’ धोरण अमेरिकेने आजवर बाळगले आहे.