गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि भारतामध्ये काहीसा तणाव निर्माण झालेला आहे. व्यापारी धोरण, व्हिसाचे नियम आणि जागतिक राजकारण, रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा, टॅरिफ अशा अनेक मुद्यांमुळे अमेरिका आणि भारतामध्ये राजनैतिक संबंधांवर परिणाम झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा भारतावर टीकाही केली आहे. त्यामुळे सध्या भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे.
दरम्यान, यातच आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा एक रंजक किस्सा अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक नेत्यांबरोबरच्या बैठकादरम्यान त्यांच्या हस्तांदोलनाने अनेकदा लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील हस्तांदोलनाचा एक किस्सा जॉन बोल्टन यांनी सांगितला आहे.
जॉन बोल्टन यांनी काय म्हटलं?
पंतप्रधान मोदी यांनी एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी एवढ्या जोरात हस्तांदोलन केलं की डोनाल्ड ट्रम्प यांची अक्षरशः दमछाक झाली होती, असं जॉन बोल्टन यांनी म्हटलं आहे. “पंतप्रधान मोदींनी एकदा ट्रम्प यांच्याशी इतक्या जोरात हस्तांदोलन केलं होतं की, ट्रम्प यांना धाप लागली होती. त्यामुळे यावरून असं दिसून येतं की मोदी प्रत्यक्षात किती कणखर आहेत”, असं जॉन बोल्टन यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तांदोलनाचा हा किस्सा जॉन बोल्टन यांनी आता सांगितला असला तरी हे हस्तांदोलन केव्हा झालं होतं आणि कोणत्या भेटीदरम्यान हा किस्सा घडला होता? याबाबत त्यांनी अधिक भाष्य केलेलं नाही.
“Prime Minister Modi once shook Trump’s hand so hard that Trump was left gasping. Which reminds you of how strong Modi actually is,” recalls Trump’s former National Security Adviser John Bolton https://t.co/36vtzaGwWK
— Shashank Mattoo (@MattooShashank) October 12, 2026
मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ३० सप्टेंबर रोजी फोनवरुन विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली होती. व्यापार, संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दिली होती. पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, “डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी विविध विषयांवर महत्वाची चर्चा झाली. आम्ही व्यापार, संरक्षण, ऊर्जा, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमधील आमच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. आमची ‘सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी’ पुढे नेण्यासाठी निकटचा संवाद कायम ठेवण्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे”, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी सांगितली होती. तसेच “जागतिक शांतता आणि सुरक्षा अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांसह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही आम्ही विचार-विनिमय केला”, असंही मोदींनी म्हटलं होतं.
