‘जॉनी जॉनी येस पापा’ ही कविता अभ्यासक्रमातून वगळली पाहिजे, यामुळे मुलं खोटं बोलायला शिकतात असा दावा करत भाजपाच्या मंत्र्याने केला आहे. ज्यावरुन आता वाद सुरु झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री अससलेले योगेंद्र उपाध्याय यांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता या वक्तव्यावरुन वाद रंगला आहे.
६ मे रोजी एका कार्यक्रमात योगेंद्र उपाध्याय काय म्हणाले?
उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री आणि प्रभारी मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी ६ मे रोजी कानपूर येथील मर्चंट चेंबर हॉलमध्ये आयोजित ‘शिक्षणमित्रांच्या’ मानधनवाढ समारंभात शिक्षण आणि मूल्यांवर भाषण केले. यावेळी त्यांनी ‘जॉनी जॉनी येस पापा’ या लोकप्रिय इंग्रजी कवितेवर आक्षेप घेतला. ही कविता मुलांना खोटे बोलण्यास प्रोत्साहित करतात असे ते म्हणाले. हिंदी कवितांचा संदर्भ देत, मंत्र्यांनी शिक्षकांना अभ्यासक्रमासोबतच मूल्यांची शिकवण देणारी प्रणाली तयार करण्याचे आवाहन केलं.
कवितेतल्या ओळी खोटं बोलायला शिकवणाऱ्या-उपाध्याय
मंत्री योगेंद्र उपाध्याय म्हणाले की, जेव्हा शिक्षक गुरूची भूमिका घेतात, तेव्हाच ते शिक्षणासोबत मूल्ये देऊ शकतात. त्यांनी असा युक्तिवाद केला की, ‘इटिंग शुगर, नो पापा’ यांसारख्या ओळी लहानपणापासूनच मुलांच्या मनात खोटे बोलण्याचे बीज पेरतात. त्या मुलांना खोटं बोलायला शिकवतात असा इशारा त्यांनी दिला.
धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिणार असल्याचंही केलं स्पष्ट
पाश्चात्य संस्कृती असलेल्या या इंग्रजी कविता आजच्या पिढीला आवश्यक असलेली मूल्ये देत नाहीत. त्यांनी जुन्या पिढ्या वाचत मोठ्या झालेल्या हिंदी कवितांची आठवण करून दिली, ज्यात जीवनाची सखोल मूल्ये सामावलेली होती. शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसावे. शिक्षक तो असतो जो छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना जीवनाचा योग्य मार्ग दाखवतो. ज्या दिवशी शिक्षक अभ्यासापलीकडील मूल्यांवर चर्चा करू लागतील, त्या दिवशी ते गुरू बनतील. तरच भावी पिढ्यांची योग्य जडणघडण शक्य होईल. या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही दाखवण्यात आलं. याच कार्यक्रमात योगेंद्र उपाध्याय यांनी ही कविता अभ्यासक्रमातून वगळा अशीही मागणी केली. त्यामुळे आता वाद सुरु झाला आहे. अशा प्रकारची कविता अभ्यासक्रमात असता कामा नये यासाठी मी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिणार आहे असंही योगेंद्र उपाध्याय यांनी म्हटलं होतं ज्यानुसार त्यांनी दोन दिवसांपूर्वी हे पत्र लिहून कविता अभ्यासक्रमातून हटवण्याची मागणीही केली आहे. दरम्यान या कार्यक्रमात ‘जॉनी जॉनी येस पापा’ आणि ‘रेन रेन गो अवे’ या दोन्ही कवितांवर त्यांनी आक्षेप घेतला.

योगेंद्र उपाध्याय यांनी जॉनी जॉनी कवितेबाबत मांडलेले मुद्दे काय?
कुठलीही भाषा ही फक्त भाषा नसते, ती संस्कारक्षम असली पाहिजे.
इंग्रजी भाषेबाबत माझा कुठलाही आक्षेप नाही. मात्र जॉनी जॉनी येस पापा सारखी कविता ही मुलांना खोटं बोलण्यास प्रवृत्त करते असं माझं मत आहे.
अशा प्रकारच्या कविता मुलांना शिकवून त्यांना चुकीच्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणं योग्य नाही. अशा कवितांमुळे मुलांच्या विचारांवर चुकीचा प्रभाव पडतो.
रेन रेन गो अवे ही कविताही अशीच आहे. आपली संस्कृती सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशी आहे. पण ही कविता मुलांना फक्त स्वतःचा विचार करा असं शिकवते.
जॉनी जॉनी येस पापा कवितेचा इतिहास काय आहे?
जॉनी जॉनी येस पापा ही कविता प्रसिद्ध नर्सरी ऱ्हाईम आहे. या कवितेचा कवी किंवा कवयित्री कोण? हे नीटसं सांगता येत नाही. त्याबाबतची माहिती उपलब्ध नाही. मात्र १९६० च्या दशकात ही कविता लिहिली गेली. ज्यानंतर ही कविता मुलांची कविता किंवा बडबडगीत म्हणून प्रसिद्ध झाली. या कवितेबाबत एक असाही किस्सा सांगितला जातो की १९८९ मध्ये फ्रान्सिलिया बटलर या शिक्षिकेने ही कविता तिच्या आवाजात रेकॉर्ड केली. ज्यानंतर या कवितेच्या बऱ्याच आवृत्त्या तयार झाल्या. ही कविता जगभरात पोहचली आणि आजही ती एक प्रसिद्ध नर्सरी ऱ्हाईम किंवा लहान मुलांची कविता म्हणून प्रसिद्ध आहे.

योगेंद्र उपाध्याय यांना केलं जातं आहे ट्रोल
दरम्यान योगेंद्र उपाध्याय यांनी कविता अभ्यास क्रमातून वगळण्याची जी मागणी केली आहे त्यानंतर त्यांना ट्रोल केलं जातं आहे. योगेंद्र उपाध्याय यांना बडबडगीत आणि कविता यांच्यातला फरक कळत नाही का? असं एका युजरने विचारलं आहे. तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की योगेंद्र उपाध्याय नेमकं काय म्हणत आहेत हे त्यांना समजतं आहे का? तिसरा युजर म्हणतो होय जॉनी खोटं बोलायला शिकवतो, तुम्हाला खरं बोलायचं असेल तर भाजपात जा. असं म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
