तमिळनाडूच्या तिरुपेत्तूर जिल्ह्यातील जोलारपेट्टई रेल्वे जंक्शनवर एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या जंक्शनच्या रेल्वे यार्डात उभे असलेले रेल्वेचे तब्बल ७ रिकामे डबे कोणत्याही इंजिनशिवाय अचानक मुख्य रुळावर धावू लागले. जवळपास ६ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर हे डबे तामलेरी मुथूरजवळ रुळावरून घसरले. सुदैवाने, गेटकीपरच्या सतर्कतेमुळे बेंगळुरू-चेन्नई मार्गावरील एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. या संदर्भातील वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.
नेमकं काय घडलं?
जोलारपेट्टई जंक्शनच्या मेंटेनन्स यार्डात दुरुस्तीच्या कामासाठी हे सात रिकामे डबे उभे करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, एका इंजिनने या डब्यांना पुढे ढकलले होते. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे डबे सुरक्षितपणे लॉक केले नाहीत किंवा त्यावर योग्य ते नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे इंजिन वेगळे होताच हे डबे उताराच्या दिशेने आपोआप धावू लागले.
यार्डच्या सीमा ओलांडून हे डबे थेट बेंगळुरू-जोलारपेट्टई मुख्य रेल्वे मार्गावर आले आणि धावत-धावत सुमारे ६ किलोमीटर पुढे गेले. शेवटी तामलेरी मुथूर परिसरात हे डबे रुळावरून खाली उतरले.
गेटमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
डबे रुळावरून घसरताना झालेल्या विचित्र आवाजामुळे तेथे कार्यरत असलेल्या गेटमॅनचे तात्काळ लक्ष गेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने क्षणाचाही विलंब न लावता उच्च अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
या अलर्टनंतर रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली. बेंगळुरूकडून जोलारपेट्टईच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रवाशी गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर तातडीने थांबवण्यात आल्या. त्यामुळे चालत्या ट्रेनशी होणारी संभाव्य मोठी धडक टळली.
जेसीबी अन् गॅस कटरच्या साहाय्याने बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक, वरिष्ठ अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मुख्य रेल्वे मार्ग मोकळा करण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेण्यात आली.
- डबे एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी गॅस-कटिंग उपकरणांचा वापर करण्यात आला.
- रुळावरून घसरलेले डबे बाजूला करण्यासाठी जेसीबी मशिनरीची मदत घेण्यात आली.
बेंगळुरू-चेन्नई रेल्वे वाहतूक प्रभावित
या घटनेमुळे बेंगळुरू-चेन्नई मुख्य रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. अनेक महत्त्वाच्या गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
जोलारपेट्टई जंक्शनचे महत्त्व: जोलारपेट्टई हे दक्षिण भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. येथे तब्बल १६ रेल्वे मार्ग असून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे यार्ड म्हणूनही या जंक्शनची ओळख आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या रेल्वे यार्डात घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुरुस्तीसाठी आणलेले डबे सुरक्षित का केले गेले नाहीत? याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
