Joseph Vijay Tamil Nadu CM Swearing-in Ceremony Update: तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीत टीव्हीके सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी पक्षाकडे बहुमत नसल्याने त्यांच्या सत्तास्थापनेत अडथळे येत आहेत. दरम्यान तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या या राजकीय नाट्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक नवीन वळण आल्याचे पाहायला मिळाले. टीव्हीके प्रमुख विजय शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे वाटत होते, मात्र अगदी शेवटच्या क्षणी आवश्यक असलेल्या पाठिंब्याच्या पत्राबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने राज्यपालांना शपथविधीची अधिकृत घोषणा पुढे ढकलावी लागली आहे.
लोकभवनामधील सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडे टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे अद्याप ‘व्हीसीके’कडून पाठिंब्याच्या अधिकृत पत्राची प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, विजय यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन ११६ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र सादर केले. मात्र बहुमतासाठी ११८ आमदारांचा पाठिंबा असणे अवश्यक आहे.
सीपीआय, सीपीआय (एम) या डीएमकेच्या मित्रपक्षांनी शुक्रवारी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने विजय यांचा पक्ष बहुमताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यातच व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) यांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, विजय शनिवारी सकाळी ११ वाजता शपथ घेणार असल्याचे निश्चित मानले जात होते. या पाठिंब्यामुळे आघाडीकडे एकूण १२० आमदारांचे संख्याबळ झाले होते.
मात्र यामध्ये देखील मोठी उलटफेर पाहायला मिळाला, ज्या इंडियन युनियन मुस्लिम लीगने टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांनी आता विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. आपण डीएमके आघाडीबरोबरच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्हीकेचे नेते व्हीसीकेचे प्रमुख थोल थिरुमावलवन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. लोकभवनामधील सूत्रांनी सूचित केले आहे की, व्हीसीकेकडून औपचारिक पाठिंब्याचे पत्र मिळाल्यानंतरच राज्यपाल कार्यालय शपथविधी सोहळ्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
विजय यांनी आज संध्याकाळी तमिळनाडूंच्या राज्यपालांची पुन्हा एकदा भेट घेतली. गेल्या तीन दिवसांत घेतलेली ही त्यांची तिसरी भेट होती. यापूर्वीच्या दोन भेटींमध्ये त्यांना बहुमताचा पुरावा सादर करण्यास सांगण्यात आले होते. काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआयएम यांनी पाठिंबा दिल्याने, २३४ सदस्यांच्या विधानसभेत टीव्हीके बहुमताच्या ११८ या आकड्याच्या जवळ पोहोचला आहे.
सत्तास्थापनेचा मार्ग खुला करण्यासाठी टीव्हीकेला यापूर्वीच काँग्रेसच्या ५ आमदारांसह सीपीआय, सीपीआय (एम) च्या प्रत्येकी २ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. सीपीआय (एम)ने स्थिरतेची आणि निवडणूक जनादेशाचा आदर करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे सांगत सीपीआय (एम)ने देखील बिनशर्त पाठिंब्याचे पत्रही सादर केले.
दरम्यान तमिळनाडुचे राज्यपाल आर्लेकर यांनी बुधवारी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांनी विजय यांच्याकडे बहुमत नसल्याचे कारण दिले होते, ज्यामुळे राज्यापालांवर विरोधी पक्षांकडून सडकून टीका केली जात होती. सरकार स्थापनेला उशीर व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
जोसेफ विजय यांचा शानदार विजय
विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत १०८ जागा जिंकल्या, पण २३४ सदस्यांच्या सभागृहात पक्ष बहुमताच्या आकड्यापेक्षा थोडा मागे राहिला. यामध्ये विजयने स्वतः निवडणूक लढवलेल्या दोन्ही जागांवर विजय मिळवला असून, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांना यापैकी एक मतदारसंघ सोडावा लागणार आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. या विजयामुळे डीएमके आणि एआयएडीएमके या पक्षांचे अनेक दशकांपासून असलेले वर्चस्व मोडीत निघाले आहे. या निवडणुकीत डीएमकेला ५९, तर एआयएडीएमकेला ४७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
