CM Joseph Vijay Video: कावेरीच्या पाण्यावरुन वाद सुरु असताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी मंगळवारी मेट्टूर धरणाचे दरवाजे उघडले. डेल्टा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी कावेरीचे पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री विजय यांनी स्वत: उपस्थित राहत धरणाचे दरवाजे खुले केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सालेम येथील स्थानिकांची भेट घेऊन संवाद साधला. मुख्यमंत्री विजय यांनी येथील एका वृद्ध महिलेची आपुलकीने विचारपूस करत स्वत:चा गॉगल देखील महिलेला भेट दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, वृद्ध महिला याबाबत आनंद व्यक्त करत आहेत.
मेट्टूर धरणाचे दरवाजे उघडले
कर्नाटकबरोबर कावेरीच्या पाण्यावरुन तमिळनाडू सरकारचा वाद सुरु आहे. हा वाद धुमसत असतानाच मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सालेम जिल्ह्यातील मेट्टूर धरणाचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी आज शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे खुले केले. जलशयातील या पाण्याची १२ डेल्टा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील ४५ दिवसांसाठी लाभ होणार आहे. कमी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसल्यानंतर तमिळनाडू सरकारने जलशयाचे पाणी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. भात उत्पादनात आघाडीवर असलेल्या तंजावर भागाला या पाण्याचा अधिक लाभ होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली स्थानिकांची भेट
या नियोजित सरकारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री जोसेफ विजय सालेम जिल्ह्यात असताना त्यांनी स्थानिकांची देखील भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एका कुटुंबाशी संवाद साधताना त्यांची कुटुंबातील वृद्ध महिलेचीही भेट घेऊन आपुलकीने चौकशी केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीने आनंदीत झालेल्या महिलेने जोसेफ विजय यांना मिठी मारत आनंद व्यक्त केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील वृद्ध महिलेला इतर भेटवस्तूंच्यासह स्वत:चा गॉगल/चष्मा भेट दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरला आहे.
वृद्ध महिलेला दिला गॉगल भेट
‘चेल्लम’ असे या वृद्ध महिलेचे नाव असून, मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या भेटीनंतर अतिशय आनंद झाल्याचे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. “ते (मुख्यमंत्री) आले आणि माझ्या शेजारी येऊन उभे राहिले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी त्यांना मला किती आनंद झालाय ते सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी मला हे गॉगल भेट दिले”, असे चेल्लम यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि जलस्त्रोतमंत्री एन. आनंद यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी शेतकऱ्यांची देखील संवाद साधला.
