तमिळनाडूच्या विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांची नक्कल करत जे भाषण केलं ते चांगलंच चर्चेत आलं आहे. जोसेफ विजय यांनी स्टॅलिन यांच्याप्रमाणे केलेली नक्कल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जोसेफ विजय बोलायला उभे राहिले. त्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार म्हणजेच डीएमकेचे आमदार घोषणा देऊन त्यांच्या भाषणात अडथळा आणू लागले.त्यांना उत्तर देण्यासाठी मग विजय यांनी स्टॅलिन यांची नक्कल केली आणि डीएमकेच्या भ्रष्टाचाराचा एक प्रकारे पाढाच वाचला.
तमिळनाडू विधानसभेत नेमकं काय घडलं?
तामिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांनी अभिनंदन प्रस्ताव सादर केला. त्यानंतर टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री जोसेफ विजय बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच डीएमके पक्षाचे आमदार उभे राहून घोषणा देऊ लागले आणि विजय यांच्या भाषणात अडथळा निर्माण करु लागले. जोसेफ विजय हे राजकीय संधीसाधू आहेत या आशयाच्या घोषणा डीएमकेच्या आमदारांनी दिल्या. तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष जेसीडी प्रभाकर यांनी विरोधी पक्षातील आमदारांना शांत बसण्याचं आवाहन केलं, मुख्यमंत्र्यांचं भाषण होऊ द्या अशी विनंतीही केली. पण काहीही उपयोग झाला नाही. ज्यानंतर जोसेफ विजय यांनी स्टॅलिन यांची नक्कल केली. त्यानंतर डीएमकेने पार्टी फंड या नावाखाली कसा पैसा गोळा केला? कसा भ्रष्टाचार केला याचा पाढाच वाचला. त्यावेळी त्यांनी स्टॅलिन यांची जी नक्कल केली तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी स्टॅलिन यांची नक्कल केली आहे. स्टॅलिन यांच्या प्रमाणे त्यांनी हातवारे करत ही नक्कल केली आहे. त्यावर लोक चांगलेच व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
विरोधी पक्षाचे आमदार मुद्दा मांडतात तेव्हा त्यात कांगावाच अधिक-विजय
एवढंच नाही तर टीव्हीके हा पक्ष आमदारांच्या घोडेबाजारात गुंतला होता अशी जी टीका डीएमकेने त्यांच्यावर केली होती त्या टीकेला उत्तर देण्याची आयती संधीच चालून आल्याने विजय यांनी त्यावर भाष्य केलं. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि मुस्लिम लीग यांनी त्यांचा त्यांचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला आहे असं त्यांनी सभागृहाला सांगितलं. एवढंच नाही तर विरोधी पक्षातले लोक आमच्या सरकारवर जी टीका करत आहेत आणि गुन्हेगारी वाढल्याचं आणि अंमली पदार्थांचा वापर वाढल्याचे जे आरोप करत आहेत ते सगळे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत असंही विजय यांनी म्हटलं आहे. तसंच विरोधी पक्षातले आमदार जेव्हा एखादा मुद्दा मांडतात तेव्हा त्यात तथ्यांपेक्षा कांगावा करणं हे जास्त दिसून येतं असंही त्यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. जोसेफ विजय यांनी जेव्हा स्टॅलिन यांची नक्कल केली त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
