उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामहून डेहराडूनच्या दिशेने उड्डाण केलेले एक हेलिकॉप्टर जोशीमठजवळील दुर्गम आणि डोंगराळ भागात कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलटसह सर्व ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी मदतकार्य राबवून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या संदर्भातील वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.

बद्रीनाथ दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला

उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ट्रान्स भारत एव्हिएशन’ या खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनच्या दिशेने निघाले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील ‘हत्ती पर्वत’ या अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने भारतीय सेना, स्थानिक पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या तुकड्यांना घटनास्थळी रवाना केले. मात्र, घटनास्थळाची दुर्गमता आणि अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे मदतकार्यात मोठे आव्हान निर्माण झाले होते. मदत पथकांनी शोध मोहीम राबवून पायलटसह सर्व ६ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

बेळगावचे सुपुत्र आणि कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला

या अपघातात प्राण गमावलेले अरुण साळुंखे हे बेळगाव जिल्ह्यातील अथाणी तालुक्यातील ‘आरताळ’ गावचे रहिवासी होते. साळुंखे हे २००७ च्या बॅचचे कर्नाटक पोलीस सेवेतील अधिकारी होते. त्यांनी यापूर्वी दिल्लीत गुप्तचर विभागात सेवा बजावली होती. सध्या ते बंगळुरूच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

अरुण साळुंखे यांच्या अपघाताची बातमी समजताच आरताळ गावासह संपूर्ण बेळगाववर शोककळा पसरली. साळुंखे यांच्या नातेवाईकांनी अत्यंत भावूक होत सांगितले, “दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली. त्या वेळी सुरुवातीला भारतीय सैन्याकडून ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वीच ते बद्रीनाथ यात्रेसाठी गेले होते आणि आजच परतणार होते; मात्र त्याआधीच ही दुर्दैवी बातमी समोर आली.”*