‘गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली’

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची माहिती

gauri lankesh
गौरी लंकेश (संग्रहित छायाचित्र)

वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याची ओळख पटली असल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणातील अधिक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ‘गौरी लंकेश यांचा खुनी कोण आहे, हे आम्हाला माहित आहे,’ असे रेड्डी यांनी म्हटले. मात्र याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबरला बंगळुरुत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश त्यांच्या घरात प्रवेश करत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आपली ओळख लपवण्यासाठी हल्लेखोराने हेल्मेट घातले होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असून लंकेश यांच्या हत्येनंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. धर्मनिरपेक्षतेची भाषा करणारे सत्ताधारी असतानाही मारेकरी न सापडल्याने काँग्रेस सरकार टीकेचे धनी झाले होते.

याआधी कर्नाटक सरकारमधील अनेकांनी गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येमागे समान धागा असल्याची शक्यता वर्तवली होती. कलबुर्गी यांची त्यांच्या धारवाड येथील राहत्या घरी २०१५ मध्ये हत्या झाली आहे. मात्र त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाने कलबुर्गींवर झाडण्यात आलेली गोळी स्कॉटलंड यार्डकडे पाठवली आहे. मात्र स्कॉटलंड यार्डकडून अद्याप ही गोळी परत कर्नाटक पोलिसांकडे पाठवण्यात आलेली नाही. स्कॉटलंड यार्डकडून याबद्दलची माहिती पोलीस तपासात महत्त्वाची ठरणार आहे. यावरुन कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येमागील कनेक्शनची माहिती समोर येईल.

लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर काही लोकांनी आनंद व्यक्त केला. धक्कादायक बाब म्हणजे लंकेश यांच्या मृत्यूनंतर जल्लोष करणाऱ्या काहीजणांना पंतप्रधान मोदी ट्विटरवर फॉलो करतात. याबद्दल लंकेश यांचे मित्र आणि अभिनेते प्रकाश राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘गौरी लंकेश यांच्या हत्येचा जल्लोष करणाऱ्या लोकांना पंतप्रधान ट्विटरवर फॉलो करतात. या प्रकरणात मोदी कोणतीही भूमिका घेत नाहीत. त्यावर काहीही भाष्य करत नाही. याबद्दल देशाचा एक नागरिक म्हणून मी व्यथित आहे. पंतप्रधानांच्या मौनामुळे मी दु:खी आहे,’ असे प्रकाश राज यांनी म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Journalist gauri lankeshs killers identified says karnatakas home minister ramalinga reddy