प्रसिद्ध पत्रकार आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांनी २०१७ रोजी मुरुघा मठाकडून देण्यात आलेला ‘बसवश्री’ पुरस्कार परत केला आहे. कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या ‘चित्रदूर्ग’ मठाचे प्रमुख शिवामूर्ती मुरुघा शरानारू यांना अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक झाल्यानंतर साईनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे.

शिवामूर्तींच्या अटकेनंतर मठातील वॉर्डनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

“या प्रकरणात न्यायाच्या अपेक्षेतून मी ‘बसवश्री’ पुरस्कारासह पाच लाख रुपये परत करत आहे”,अशा आशयाचं ट्वीट साईनाथ यांनी केले आहे. शिवामूर्तींवर ‘पोक्सो’ आणि ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त माध्यमांमधून कळताच आपण व्यथित झाल्याचे साईनाथ म्हणाले आहेत. लहान मुलांसंदर्भात घडत असलेल्या या गुन्ह्यांचा निषेध करण्यासाठी शब्द नाहीत, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही साईनाथ यांनी दिली आहे. हे प्रकरण उजेडात आणण्यासाठी मैसुरमधील ‘ओडानाडी’ या सामाजिक संस्थेने घेतलेल्या परिश्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले आहे. या प्रकरणाचा कर्नाटक सरकारने कसून तपास करावा, अशी अपेक्षा साईनाथ यांनी व्यक्त केली आहे.

अटकेनंतर काही तासातच शिवामूर्तींची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल

कर्नाटकमधील ‘चित्रदुर्ग’ मठाद्वारे संचालित शाळेतील दोन अल्पवयीन मुलींनी शिवामूर्तींविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल होताच शिवामूर्तींविरोधात ‘लूक आऊट’ नोटीस जारी करण्यात आली होती. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना कर्नाटक पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री त्यांची रवानगी चित्रदुर्गमधील तुरुंगात करण्यात आली होती. या दरम्यान, छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर शिवामूर्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  शिवामूर्तींच्या अटकेनंतर मठातील एका महिला वार्डनला देखील शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे.