ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. विनोद दुवा यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुवा हिने मंगळवारी (३० नोव्हेंबर) याबाबत माहिती दिली. त्यांनी सोमवारी रात्री अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, सध्या तब्येत गंभीर असल्याचं सांगण्यात आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मल्लिका दुवाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं, “रात्री बाबांना अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची अधिक चांगली काळजी घेतली जाईल. त्यांची तब्येत अतीशय नाजूक आहे. ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एक लढाऊ व्यक्ती होते. त्यांनी कधीही तडजोड केली नाही. याबाबतीत ते आपल्या कुटुंबाची वेळ आली तेव्हाही तसेच राहिले.”

“मी आणि माझी बहिण ठीक आहोत. आमचं पालनपोषण खूप कणखरपणे केलंय. त्यामुळे आम्ही बाबांची पूर्ण काळजी घेऊ. डॉक्टरांच्या सकाळच्या तपासणीनंतर जी माहिती येईल ती मी नंतर माध्यमांना देईल,” असंही मल्लिकाने नमूद केलंय. यावेळी तिने तिच्या आईविषयी देखील आठवण काढली.

पत्नीचा करोनाने मृत्यू

विनोद दुवा यांना या वर्षी सुरुवातीला करोना संसर्ग झाल्याचंही समोर आलं होतं. जून २०२१ मध्ये त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट पद्मावती चिन्ना दुवा यांनाही करोना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

कोण आहेत विनोद दुवा?

विनोद दुवा यांनी १९७४ मध्ये दूरदर्शनपासून कामाला सुरुवात केली. पुढे त्यांनी एनडीटीव्ही, सहारा अशा इतरही वृत्तवाहिन्यांसोबत काम केलं. काही काळाने त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी काढून विविध वृत्तवाहिन्यांसाठी कार्यक्रम सादर केले.

विनोद दुवा यांचा जन्म तेव्हाच्या डेरा इस्माईल खान आणि सध्याच्या पाकिस्तानातील खैबर-पख्तुन्वा प्रांतातला आहे. त्यांचं बालपण निर्वासितांच्या छावणीत गेलं. त्यांनी बोफोर्स प्रकरणात घेतलेल्या विविध मंत्र्यांच्या मुलाखती चांगल्याच गाजल्या. त्यांच्या पत्रकारितेतील कामासाठी त्यांना रामनाथ गोएंका आणि पद्मश्री अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist vinod dua health become critical inform daughter mallika pbs
First published on: 30-11-2021 at 19:50 IST