विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिरातील दान गैरव्यवहाराच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमच्या तीन प्रमुख मागण्यांवर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असा स्पष्ट इशारा देत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट उत्तर मागितले आहे. एवढंच नाही तर गृहमंत्री अमित शाह यांचं मत काय? ते ऐकण्यात आम्हाला काहीही रस नाही. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश का दिले ते सांगा असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. ज्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि राहुल गांधींना थेट आव्हान दिलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा काय म्हणाले?

केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. जंतर-मंतर या ठिकाणी गोळीबार झालेला नाही. राहुल गांधी हे लोकांची दिशाभूल करत आहेत. राहुल गांधींना मी आज सांगू इच्छितो की चर्चेसाठी संसदे या पळ काढू नका. काँग्रेसने काय प्रश्न उपस्थित केले आणि भाजपाने काय उत्तरं दिली चला जाणून घेऊ असं म्हणत जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींना थेट आव्हान दिलं आहे.

राहुल गांधींचं म्हणणं काय?

“गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाईचे किंवा गोळीबाराचे आदेश दिले होते की नाही, याचे थेट उत्तर द्यावे,” अशी आक्रमक मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. एवढंच नाही तर इलेक्ट्रिक शॉक बॅटन चालवण्यास कुणी मंजुरी दिली ते सांगावं. तसंच पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले ते सांगावं असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. मल्लिकार्जुन खरगेंनीही ही मागणी केली आहे.

जे. पी. नड्डांचं राहुल गांधींना उत्तर काय?

जंतर-मंतरच्या आंदोलनाचा विषय हा राहुल गांधींना संसदेचा विषय करायचा आहे. जेव्हा जेव्हा सरकारने चर्चेची तयारी दर्शवली आहे तेव्हा राहुल गांधींनी पळ काढला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रत्येक विषयावर उत्तर देतील. यामध्ये कुठलीही नवी बाब नाही किंवा कुठलीच शंका असण्याचं काही कारण नाही. सरकारकडून याआधीही विविध मुद्द्यांवर उत्तरं देण्यात आली आहे. माझं राहुल गांधींना हे आव्हान आहे की त्यांनी या सगळ्यापासून पळ काढू नये.