मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून देशभरात आंदोलन सुरू आहे. विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आज (१ नोव्हेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा काढला आहे.

इंडिया आघाडीच्या या महारॅलीवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींवर या महारॅलीवरून हल्लाबोल केला आहे. ‘भारत देश हा बनाना रिपब्लिक नाहीये’, असं म्हणत जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींवर अराजकता पसरवण्याचा आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप केला. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

जे.पी.नड्डा यांनी काय म्हटलं?

इंडिया आघाडीच्या रॅलीवर भाष्य करताना केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी म्हटलं की, “आज रामलीला मैदानावर जे काही घडत आहे, तो लोकशाहीचा आदर करण्याचा प्रकार नसून लोकशाहीच्या नावाखाली देशाला अराजकतेच्या खाईत लोटण्याचा एक कट आहे. ज्यांना जनतेने वारंवार नाकारलं आहे आणि पराभूत केलंय, अशा लोकांकडून रचलेलं हे एक नाटक आहे. हे वास्तव जनतेलाही माहिती आहे”, अशी टीका जे.पी.नड्डा यांनी केली आहे.

“राहुल गांधी यांच्या राजकारणाच्या स्वरूपाचा पहिला टप्पा म्हणजे खोट्या गोष्टी आणि अफवा पसरवणं, दुसरं म्हणजे रस्त्यावर अराजकता आणि गोंधळ निर्माण करणं, तिसरं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवणं आणि चौथं म्हणजे परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणं होय”, अशी टीका जे.पी.नड्डा यांनी केली.

“आज राहुल गांधी यांनी काढलेल्या मोर्चामागे काय उद्देश आहे? तर पहिला उद्देश म्हणजे आपल्या शीख बांधवांच्या जखमेवर मीठ चोळणं, दुसरं म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पाडण्यासाठी दिल्लीत दंगली आणि गोंधळ घडवून आणणं, तिसरं म्हणजे सणासुदीच्या काळात दिल्लीतील दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी फिरवणं आणि चौथं म्हणजे देशाची बदनामी करणं. पण राहुल गांधींजी हा भारत काही ‘बनाना रिपब्लिक’ नाहीये.”, असं म्हणत जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींवर टीका केली.