आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध बँकिंग आणि आर्थिक सेवा कंपनी जे. पी. मॉर्गनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (JPMorgan Chase CEO) जेमी डायमन यांनी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची खिल्ली उडवली. मात्र, काही वेळेतच त्याचे जगभरात पडसाद उमटाले आणि चीनने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे जेमी डायमन यांनी याबद्दल जाहीर माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. “मी तो विनोद करायला नको होता”, असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

जेमी डायमन यांनी नेमका काय विनोद केला?

जेमी डायमन बॉस्टनमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “मी काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगमध्ये होतो. तेव्हा मी विनोद केला की चीनचा कम्युनिस्ट पक्ष १०० वर्षे साजरा करत आहे. जे. पी. मॉर्गन देखील साजरं करतंय. मात्र, जे. पी. मॉर्गन जास्त काळ टिकेल. यावर मी पैज लावू शकतो.”

अमेरिकेच्या अनेक मोठ्या बँकांचं चीनमध्ये देखील काम चालतं. मात्र, चीनमध्ये या बँकांना किती संधी मिळणार हे चीन सरकारच्या इच्छेवरच अवलंबून असतं. जे. पी. मॉर्गनचे सीईओ जेमी डायमन मनात येईल ते बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, यावेळी चीनच्या सत्ताधारी पक्षावर केलेला विनोद त्यांना महागात पडल्याचं दिसतंय. त्यामुळेच त्यांनी तात्काळ यावर निवेदन जारी करत माफी मागितली आहे.

हेही वाचा : तैवानचा मुद्दा पेटला! जो बायडेन यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना स्पष्टच सांगितलं; म्हणाले…!

डायमन यांनी माफीनाम्यात काय म्हटलं?

डायमन आपल्या माफीनाम्यात म्हणाले, “मी जे. पी. मॉर्गन कंपनीची ताकद आणि ती अधिक काळ टिकून राहिल यावर जोर देऊन बोलत होतो. मात्र, कोणत्याही लोकांच्या समुहाविषयी विनोद करणं किंवा त्यांना बदनाम करणं योग्य नाही. मग तो एखादा देश असेल, त्यांचं नेतृत्व असेल किंवा समाज/संस्कृतीचा एखादा भाग असेल असा विनोद चुकीचा आहे.”