गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांनी शुक्रवारी एक गंभीर आरोप केला आहे.
आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासाठी स्वतःच्याच पक्षातून एक षडयंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोप जुएल ओराम यांनी केला आहे. हे षडयंत्र रचण्यामध्ये सहभागी असलेल्यांना जुएल ओराम यांनी मोठा इशाराही दिला आहे. जुएल ओराम हे सुंदरगढ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
मंत्री जुएल ओराम यांनी काय आरोप केले?
“काही लोक माझ्याविरुद्ध बदनामीकारक मोहीम राबवून मला बदनाम करण्यासाठी पैसे खर्च करत आहेत आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. त्यांना वाटतं की जर मला केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळलं, तर त्यांच्यासाठी संधी निर्माण होईल”, असं मंत्री जुएल ओराम यांनी म्हटलं. मात्र, कोणाचंही नाव न घेता जुएल ओराम यांनी इशारा दिला की, “जर कोणी आपली प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तरत त्यांचे हात कापून फेकून देण्याची ताकद आपल्यात आहे.”
दरम्यान, ओडिशातील भाजपाच्या सरचिटणीसांना या संदर्भातील माहिती त्यांनी दिली असल्याचं म्हटलं आहे. तसेच जर हा प्रश्न सुटला नाही किंवा राज्य पातळीवर न्याय मिळाला नाही, तर आपण हा मुद्दा केंद्रीय नेतृत्वाकडेही मांडणार असल्याचा इशारा जुएल ओराम यांनी दिला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
जुएल ओराम यांनी आरोप केला आहे की, इतर पक्षांतून भाजपामध्ये आलेले काही नेते आपल्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही वर्षांत पक्षाने मला जे पद, जबाबदारी आणि सन्मान दिला, त्याबद्दल मी समाधानी आहे. मात्र, अशा षडयंत्राचा मी निषेध करतो, असंही जुएल ओराम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आपण यापुढे कोणतीही थेट निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा काही दिवसांपूर्वी जुएल ओराम यांनी केली होती. मात्र, आता त्यांनी ही भूमिका बदलत आपण पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर केलं आहे. “माझ्या विरोधात काम करणाऱ्यांना मी राजकीयदृष्ट्या माझ्याशी सामना करण्याचं आव्हान देतो. त्यांची काय अवस्था होईल ते तुम्ही पाहालच”, असा इशारा जुएल ओराम यांनी दिला आहे.
