देशात एनआरसी आणि सुधारित नागरिकत्वावरून गोंधळाचं वातावरण असताना सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्ती न्यायमूर्ती मार्कडेंय काटजू यांच्याकडे एक आंतरजातीय विवाह केलेल्या महिलेने आपली व्यथा मांडली आहे. एका महिला न्यायाधीशाची पत्नी आम्हाला जातीवरून हिणवत असून, त्रास देत असल्याचं महिलेनेनं म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी आणि एनपीआरवरून देशात संभ्रम निर्माण झालेला आहे. सगळीकडे यावरून गदारोळ सुरू असताना हिंदू व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केलेल्या एका मुस्लीम महिलेने सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्तींकडे होत असलेल्या छळाची तक्रार करत मदत मागितली आहे. महिलेनं पाठवलेला ईमेल काटजू यांनी ट्विट केला आहे.

पत्रात महिलेनं म्हटलं आहे की, “सर, मी एक मुस्लीम मुलगी आहे. तर माझे पती हिंदू आहेत. आम्हाला चार वर्षांची एक मुलगी आहे. आमच्या शेजारी एक न्यायाधीश राहतात. त्यांची पत्नी काही दिवसांपासून दररोज हिणवत असते. आम्ही समाजातून हाकलून दिलेले लोक आहोत. आम्ही पळालेले लोक आहोत. कारण आम्ही आंतरजातीय विवाह केलेला आहे. न्यायाधीशाची पत्नी आम्हाला म्हणते की, माझे हिंदूंच्या नावावर कलंक आहे. त्यांनी कपभर पाण्यात बुडून मरायला हवं. त्यांनी स्वतःच्या धर्माचा मान ठेवला नाही. मांसाहार करणाऱ्या करणाऱ्या मुलीशी लग्न केलं. तीन चार दिवसांपूर्वी आमच्यात याच कारणावरून भांडण झालं. न्यायाधीशाच्या पत्नीनं पोलिसांना बोलावलं. अनेक खोटे आरोप आमच्यावर लावले. माझ्या पतीनं तिच्यावर हात उचलला तसेच घरातही घुसले, असा आरोप तिनं केला आहे. त्यानंतर पोलीस आले आणि माझ्या पतीला घेऊन गेले. पुढे काय करायचं याविषयी मला काहीच सूचत नाहीये. पोलिसांनी मला किंवा आजूबाजूच्या लोकांनाही विचारलं नाही. ती न्यायाधीशाची पत्नी असल्यानं इथे सगळे तिला घाबरतात. ती महिला ब्राह्मण असून, त्यांना यांचा प्रचंड गर्व आहे. सर, आम्हाला खालचे लोक म्हणून हिणावत असते. आम्हाला नेहमी त्यांच्यासमोर आमची काहीच लायकी नाही. आम्ही किंमत नसलेले लोक आहोत, असं बोलत असते. सर, पोलीस आणि सरकारही आमची साथ देत नाहीये. आता काय करू, कुठे जाऊ,” असं सांगत महिलेने काटजू यांच्याकडे मदतीची याचना केली आहे.