पीटीआय, नवी दिल्ली दिल्लीमधील जुन्या राजेंद्रनगर भागात शनिवारी झालेल्या दुर्घटनाप्रकरणी, दिल्ली न्यायालयाने पाच जणांच्या जामीन अर्जावरील निकाल मंगळवारी राखीव ठेवला. राव आयएएस स्टडी सर्कलच्या तळघरामध्ये पावसाचे पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्या प्रकरणी एका एसयूव्हीचालकासह तळघराच्या चार मालकांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली, त्यावेळी बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत निकाल राखीव ठेवत असल्याचे न्यायदंडाधिकारी विनोद कुमार यांनी जाहीर केले. एसयूव्हीचालक मनुज कथुरिया याला झालेली अटक बेकायदा असल्याचा त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. त्याने पावसाचे पाणी साचलेल्या रस्त्यावर वाहन चालवल्यामुळे पाण्याचा फुगवटा होऊन ते पाणी तळघरात शिरल्याचा पोलिसांचा आरोप आहे. मात्र, आपल्याला विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल काहीही माहिती नव्हती किंवा तसा हेतूही नव्हता असे कथुरियाने सांगितले आहे. त्याचे वकील राकेश मल्होत्रा यांनी विचारले की, ‘‘या दुर्दैवी घटनेचे कारण काय आहे? अन्य कारणासाठी असलेल्या तळघरात वाचनालय चालवणे हे की, दिल्ली महापालिका, दिल्ली जल बोर्ड यांना पाणी साचणे टाळण्यात आलेले अपयश?’’ दिल्ली न्यायालयाने सोमवारी कथुरियासह तेजिंदर सिंग, परविंदर सिंग, हरविंदर सिंग आणि सरबजीत सिंग या तळघराच्या सहमालकांना १२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.