न्यायाधीश हत्येचे सर्वोच्च न्यायालयात पडसाद

सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

झारखंड उच्च न्यायालयाच्या विनंतीवरून हस्तक्षेपास नकार

धनबाद येथील न्यायाधीशांच्या कथित हत्याप्रकरणाचे पडसाद गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात उमटले. या कथित हत्या प्रकरणाची झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी दखल घेतली असून त्यांनी त्यासंबंधीत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेपास नकार दिला आहे.

ही घटना ‘धक्कादायक’ असून न्याय व्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर हा हल्ला असल्याचे सांगत, सुप्रिम कोर्ट बार असोसिएशनचे (एससीबीए) अध्यक्ष अ‍ॅड. विकास सिंग यांनी या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंतीही केली होती.  सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठाने त्यावर म्हटले आहे, की आम्हाला या घटनेची माहिती आहे आणि ‘एससीबीए’च्या प्रयत्नांना आम्ही दाद देतो. मात्र, आम्ही झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोललो. त्यांनी हे प्रकरण हाती घेतले असून संबंधीत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असून तेथेच चालू द्यावे. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयापुढे हे प्रकरण मांडण्यापूर्वी अ‍ॅड. विकास सिंग यांनी न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर मांडले होते. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीच सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण मांडण्यास सांगितले होते.

दहशत निर्माण करण्यासाठी…

या चित्रफितीत रिक्षा अचानक आनंद यांना धडक देऊन निघून जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा अपघात नसून हत्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विकास सिंग यांनी सांगितले की, या हत्येत गुंतलेल्या व्यक्ती नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहे.

सूडभावनेतून प्रकार…

याबाबत प्रसारित झालेल्या चित्रफीतीसाठी व्हिडीओ कॅमेरा वापरण्यात आला असून तो अधिकाधिक स्पष्टपणे घटना दाखवत आहे. एका गुं़़डाविरोधात या न्यायाधीशांनी निकाल दिल्यामुळे सूडभावनेतून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

धनबादचे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद हे बुधवारी पहाटे फेरफटका मारण्यासाठी जिल्हा न्यायालयाजवळील रणधीर वर्मा चौकात एका रिक्षाने त्यांना धडक दिली. त्यात जबर जखमी झालेल्या आनंद यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची चित्रफीत समाजमाध्यमांवरून देशभरात पसरली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Judicial assassination reverberates in supreme court akp