कीव्ह – अमेरिकेने युक्रेन आणि रशियाला युद्ध संपवण्यासाठी करार करण्यासाठी जूनची अंतिम मुदत दिली आहे, असे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, जर जूनपर्यंत करार झाला नाही, तर ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी २०२२पासून हे युद्ध सुरू आहे.

‘अमेरिकेच्या प्रशासनाला हे युद्ध या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच संपवायचे आहे आणि त्यासाठी ठरावीक वेळापत्रकानुसार ते पावले उचलतील.’ असे झेलेन्स्की म्हणाले. ते म्हणाले की, पुढील फेरीतील त्रिपक्षीय चर्चा (अमेरिका-युक्रेन-रशिया) पुढील आठवड्यात पहिल्यांदाच अमेरिकेत होऊ शकते. ही बैठक बहुधा मायामी येथे होईल. ‘या चर्चेत सहभागी होण्यास आम्ही संमती दिली आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

झेलेन्स्की यांच्या मते, रशियाने अमेरिकेसमोर सुमारे १२ ट्रिलियन डॉलर्सचा आर्थिक प्रस्ताव मांडला आहे. रशियचे दूत किरिल द्मित्रिएव्ह यांच्या नावावरून त्यांनी या प्रस्तावाला ‘द्मित्रिएव्ह पॅकेज’ असे नाव दिले. अमेरिका-रशिया यांच्यातील आर्थिक करार हे एकूण चर्चेचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रशियाने युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर मोठे हल्ले सुरूच ठेवले आहेत. शनिवारी रात्री एकाच वेळी ४०० हून अधिक ड्रोन आणि सुमारे ४० क्षेपणास्त्रे डागण्यात आली, असे झेलेन्स्की यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे. वीज ग्रीड, वीज निर्मिती केंद्रे आणि वितरण यंत्रणा हे हल्ल्यांचे लक्ष्य होते. युक्रेनची सरकारी वीज वाहतूक संस्था उक्रएनर्जोने सांगितले की, या वर्षातील ऊर्जा व्यवस्थेवरील हा दुसरा मोठा हल्ला असून, त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पांना वीज उत्पादन कमी करावे लागले. आठ वेगवेगळ्या प्रदेशांतील आठ केंद्रांवर हल्ले झाले.

उक्रएनर्जोच्या निवेदनानुसार, महत्त्वाच्या उच्च-दाब उपकेंद्रांवर क्षेपणास्त्र हल्ले झाल्याने युक्रेनच्या नियंत्रणाखालील सर्व अणुऊर्जा प्रकल्पांना उत्पादन कमी करावे लागले. त्यामुळे देशातील वीजटंचाई मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्व प्रदेशांत तासन्तास वीज कपात वाढवावी लागली आहे.