दिल्लीमधील मानसरोवर पार्क परिसरामध्ये एका ३१ वर्षीय ज्युनियर इंजिनियरला चोरी करुन चोरी केलेली दागिणे विकताना पकडण्यात आलंय. एका महिल्याच्या कानातील दागिन्यांवर डल्ला मारुन आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी हे दागिणे विकण्याऱ्या व्यक्तीला पोलिसांनी केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहित गौतम असं या आरोपीचं नाव असून तो शासदरा येथील ज्योती नगरचा रहिवासी आहे. शुक्रवारी मानसरोवर पार्क पोलीस स्थानकामध्ये कानातील डूल चोरीला गेल्याची तक्रार एका महिलेने नोंदवली. बाईकवरुन आलेल्या एका व्यक्तीने आपल्या कानातील डूल खेचून घटनास्थळावरुन पळ काढल्याचं या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं.

या प्रकरणामच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी ३० वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. या तपासामध्ये त्यांना बाईकस्वार चोर कोणत्या दिशेला पळून गेला हे समजलं. या व्हिडीओमधून पोलिसांनी काही स्क्रीनशॉर्ट्स काढले. ज्यामध्ये हा चोर तोंडावर मास्क घालून असल्याचं दिसून आलं. मात्र या दुचाकीवर कोणताही क्रमांक नसल्याने चोराचा शोध घेणे हे अवघड होऊन बसले. मात्र पोलिसांनी या परिसरामध्ये आपला तपास सुरु ठेवला. या चोरीच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच रविवारी जगतपुरी वाईन शॉपजवळ पोलिसांना सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसलेल्या बाईकसारखीच बाईक दिसली. पोलिसींना सापळा लावून या बाईकच्या मालक असणाऱ्या गौतमला ताब्यात घेतलं.

पोलीस तपासादरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आपण बीएसईएसमध्ये (वीजपुरवठा विभागामध्ये) ज्यूनियर इंजिनियर पदावर कार्यकरत असल्याचं गौतमने सांगितलं. वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण ही चोरी केल्याची कबुलीही गौतमने दिली. रविवारी वाढदिवस होता आणि तो साजरा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने मी चोरी केली असं गौतमने पोलिसांना सांगितलं. गौतमने दिलेल्या माहितीनुसार त्याने हे दागिणे सुरेंद्र नावाच्या ज्वेलर्सला विकले. मात्र रविवारपासून हा सोनार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.