Premium

Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

“यामागे दोन शक्यता असू शकतात. एक तर ट्रुडो हवेत गोळीबार करतायत आणि त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. किंवा…”

justin trudea canada india conflict
जस्टिन ट्रुडो यांच्या भूमिकेवर अमेरिकेतील अभ्यासकांची टीका! (फोटो – रॉयटर्स संग्रहीत)

हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यासाठी दबाव वाढू लागला आहे. खलिस्तान समर्थक निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप ट्रुडो यांनी थेट कॅनडाच्या संसदेत केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. एकीकडे अमेरिका व ऑस्ट्रेलियाने कॅनडाची बाजू घेतली असून भारत सरकारनं तपासात सहकार्य करण्याची अपेक्षा या दोन देशांनी व्यक्त केली आहे. मात्र, दुसरीकडे अमेरिकेती अभ्यासक वर्गाकडून जस्टिन ट्रुडो यांच्या एकूणच धोरणावर संशय घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जस्टिन ट्रुडो यांचा हवेत गोळीबार?

या आरोपांनंतर कॅनडानं भारताच्या तर भारतानं कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. भारतानं कॅनडातील आपलं व्हिसा केंद्र तात्पुरतं स्थगित केलं आहे. तर दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशात जाणाऱ्या आपल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, जस्टिन ट्रुडो यांनी केलेले हे आरोप म्हणजे फक्त हवेतला गोळीबार असू शकतो, अशी शक्यता अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक व अमेरिकन सरकारमधील माजी उच्चपदस्थ अधिकारी मायकेल रुबिन यांनी व्यक्त केली आहे.

“ट्रुडो यांच्या आरोपांमध्ये दोन शक्यता”

“मला वाटतं पंतप्रधान ट्रुडोंनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी अशा पद्धतीने भारतावर आरोप केले आहेत, ज्याचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत. यामागे दोन शक्यता असू शकतात. एक तर ते हवेत गोळीबार करतायत आणि त्यांच्याकडे भारत सरकारविरोधात ते करत असलेल्या आरोपांना पाठबळ देणारे कोणतेही पुरावे नाहीत. किंवा दुसरी शक्यता म्हणजे या प्रकरणात खरंच तथ्य असू शकेल. पण कोणत्याही शक्यतेमध्ये जस्टिन ट्रुडो यांना हे सांगावंच लागेल की त्यांनी रक्तपात केलेल्या एका दहशतवाद्याला कॅनडामध्ये आश्रय का दिला होता”, असं मायकेल रुबिन एएनआयला म्हणाले.

मोठी अपडेट! कॅनडाच्या सुरक्षा सल्लागार महिन्याभरात दोन वेळा भारतात येऊन गेल्या; अजित डोवाल यांच्याशीही चर्चा

“हे म्हणजे मुंगीचं हत्तीशी वैर”

दरम्यान, मायकेल रुबिन यांनी ट्रुडो यांच्या आरोपांना व कॅनडानं भारताला आव्हान देण्याला मुंगीचं हत्तीशी वैर असल्याचं म्हटलं आहे. “या सगळ्या वादामध्ये मोठा धोका भारतापेक्षा कॅनडालाच जास्त आहे. जर कॅनडानं भारताशी वाद ओढवून घेतलाच, तर या घडीला हे एखाद्या मुंगीनं हत्तीशी वैर करण्यासारखं होईल. कारण सत्य हे आहे की भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. जागतिक स्तरावर भारत धोरणात्मकदृष्ट्या कॅनडापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा आहे. विशेषत: चीनचं आव्हान व दक्षिण आशियातील इतर समस्यांचा विचार करता भारत महत्त्वाचा आहे”, असं रुबिन यांनी नमूद केलं.

निवडणुकांसाठी ट्रुडो यांचे आरोप?

कॅनडामध्ये लवकरच निवडणुका होणार असून त्यासाठी ट्रुडो यांनी हे आरोप केले असण्याची शक्यता काही अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना रुबिन म्हणाले, “ट्रुडो यांना अद्याप कोणतेही पुरावे सादर करता आलेले नाहीत. त्यामुळे जेव्हा ते म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा, तेव्हा त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. हे सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडतंय. त्यामुळे आत्ता तरी ट्रुडो पराभूत होत असल्याचं दिसत आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Justin trudeau made a huge mistake american official on canda india conflict over hardeep nijjar murder pmw

First published on: 23-09-2023 at 10:07 IST
Next Story
मोठी अपडेट! कॅनडाच्या सुरक्षा सल्लागार महिन्याभरात दोन वेळा भारतात येऊन गेल्या; अजित डोवाल यांच्याशीही चर्चा