How many cheetah in India: मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान येथे सोमवारी नामिबियन चित्ता ‘ज्वाला’ने पाच पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे भारतातील चित्त्यांची एकूण संख्या आता ५३ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. यापैकी ५० चित्ते सध्या कुनो राष्ट्रीय उद्यानात असून तीन चित्ते गांधी सागर अभयारण्य येथे आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारतात जन्मलेल्या चित्त्यांच्या पिलांची संख्या आता ३३ झाली आहे. तसेच कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांची काळजी घेणाऱ्या पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

‘प्रोजेक्ट चित्ता’साठी अभिमानाचा क्षण

भूपेंद्र यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “चित्त्यांची संख्या अर्धशतक ओलांडणे हा ‘प्रोजेक्ट चित्ता’साठी अभिमानाचा क्षण आहे. नामिबियन चित्ता आणि तिसऱ्यांदा आई बनलेली ज्वाला हिने आज कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच पिलांना जन्म दिला. या जन्मामुळे भारतात जन्मलेल्या चित्त्यांच्या पिलांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. भारतीय भूमीवर हा चित्त्यांचा दहावा यशस्वी जन्म असून भारताच्या चित्ता संवर्धन प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

चित्त्यांची संख्या ५३ वर पोहोचली

तसेच त्यांनी पुढे नमूद केले की, “ही कामगिरी पशुवैद्यकीय तज्ज्ञ, क्षेत्रीय कर्मचारी आणि वन विभागातील सर्वांच्या समर्पित प्रयत्नांचे आणि कौशल्याचे फलित आहे. या पिलांच्या जन्मामुळे भारतातील चित्त्यांची एकूण संख्या ५३ झाली आहे. वन्यजीव संवर्धनासाठी हा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण आहे. ज्वाला आणि तिची पिले बळकट होवोत आणि भारतातील चित्त्यांच्या संवर्धनाची ही कहाणी आणखी उंचीवर जावो.”

दरम्यान, यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला होता. त्या दिवशी बोत्सवानातून आणलेल्या नऊ चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. या वेळी भूपेंद्र यादव वरिष्ठ वन अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसह उद्यानात उपस्थित होते.

प्रोजेक्ट चित्ता

फेब्रुवारीमध्ये बोत्सवानातून नऊ चित्ते भारतात आणल्यानंतर देशातील चित्त्यांची संख्या ४८ झाली होती, ज्यामध्ये भारतात जन्मलेल्या २८ पिलांचा समावेश होता. ‘प्रोजेक्ट चित्ता’ हा जगातील पहिला आंतरखंडीय चित्ता स्थानांतरण प्रकल्प असून तो १७ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आला. १९५२ मध्ये भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याला पुन्हा भारतात स्थिरावण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.