Jyoti Malhotra Espionage Case Latest Updates: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्राची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे. ज्योती मल्होत्रा ही हरियाणाची रहिवासी असून देशभरात फिरून त्याचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करत होती. मात्र, पाकिस्तानच्या आयएसआय संस्थेला ती माहिती पुरवत होती, असा धक्कादायक खुलासा समोर आला असून आता तिच्याशी संबंधित इतर यूट्यूबर्सचीची चौकशी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ज्योती मल्होत्राला हनीट्रॅप केलं गेलं होतं, असा दावा जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक शेश पॉल वैद यांनी केला आहे.
काय आहे ज्योती मल्होत्रा प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी मूळची हरियाणाच्या हिसारची असणारी ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली. भारताबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ज्योतीवर असून तिची कसून चौकशी केली जात आहे. ज्योती याआधी पाकिस्तानलादेखील जाऊन आली असून भारतातील पाकिस्तानी दूतावासातही तिचा चांगला संपर्क असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्योतीनंच गेल्या वर्षी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासाकडून इफ्तार पार्टीचं विशेष आमंत्रण आल्याचं आपल्याच व्हिडीओमध्ये नमूद केलं होतं.
ज्योती मल्होत्रानं या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दूतावासातील तत्कालीन अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश यानं आपल्याला या पार्टीसाठी विशेष आमंत्रित केल्याचंही म्हटलं आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये दानिशच ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील उच्चपदस्थांशी ओळख करून देत असल्याचंही दिसून येत आहे.
दानिशची हकालपट्टी
दरम्यान, अवघ्या आठवड्याभरापू्र्वीच भारत सरकारने दानिशची हेरगिरीच्या आरोपावरून भारतातून हकालपट्टी केली होती. दानिश व ज्योती एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होते, अशी माहितीही प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
दानिशनंच ज्योतीला हनीट्रॅप केलं?
दरम्यान, दानिश व ज्योती यांच्यातील संबंधांबाबत सध्या तर्क-वितर्क लावले जात आहेत. दानिशनंच ज्योतीला हनीट्रॅप केल्याचा दावा जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक शेश पॉल वैद यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये केला आहे. तसेच, पहलगाम हल्ल्याआधी काही महिने ज्योती या ठिकाणी जाऊन आली होती, हा फक्त योगायोग नाही, असंही ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत. यासोबत ज्योती मल्होत्राचा पहलगाम येथे काढलेला व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.
“ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी (जो आयएसआयचा माणूस असल्याचा दाट संशय आहे) दानिशनं हनीट्रॅप केलं. पण ज्योती मल्होत्रा या वर्षी जानेवारी महिन्यातच पहलगामला गेली होती, हा फक्त योगायोग आहे का? ज्योती पाकिस्तानातील आयएसआयच्या हस्तकांना संवेदनशील माहिती पुरवत असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तान, चीन वा बांगलादेशसारख्या शत्रूराष्ट्रांना किंवा त्यांच्या दूतावासांना वारंवार भेट देणाऱ्या व्यक्तींवर आपलं गुप्तहेर खातं लक्ष ठेवत असतं”, असं शेश पॉल यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
ज्योती-दानिशची बाली ट्रिप?
दरम्यान, ज्योती व दानिश हे एकत्र बाली येथे फिरण्यासाठीही गेले होते, असा दावा शेश पॉल वैद यांनी केला आहे. “दिल्लीतील पाकिस्तान दूतावास अशा सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्सला हेरतात, त्यांना डिनरसाठी बोलावतात आणि पाकिस्तानला येण्याचं निमंत्रण देतात. महागड्या भेटवस्तू देतात, फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करतात. ज्योतीला बहुधा अशाच प्रकारे दानिशनं हनीट्रॅप केलं होतं. दानिशनं तिला पैसेही पाठवले होते आणि ते दोघे बालीमध्ये फिरायलाही गेले होते”, असा दावाही वैद यांनी केला आहे.