तमिळनाडू भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. भाजपा सोडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अन्नामलाई यांच्या कानात नेमकं काय सांगितलं होतं, यावरून गेले काही दिवस अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर अन्नामलाई यांनी या गुप्त संवादात काय बोलणं झालं होतं हे स्वतःच उघड केलं आहे.

अन्नामलाई यांच्या ‘वी द लीडर्स’ (We The Leaders) या राजकीय संस्थेच्या वतीने चेन्नईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या संदर्भातील खुलासा केला. “अमित शाह मला दिल्लीत तीन वर्षांसाठी बोलावून भाजपमध्ये एक मोठी राष्ट्रीय जबाबदारी देऊ इच्छित होते. त्यांनी मला तशी थेट ऑफरही दिली होती. मात्र, मला दिल्लीत जायचं नव्हतं; मला माझ्या तमिळनाडूतील लोकांमध्येच राहून काम करायचं होतं, म्हणून मी ती ऑफर नम्रपणे नाकारली,” असा दावा अन्नामलाई यांनी केला आहे.

“मी कोणाचीही ‘बी टीम’ नाही!”

अन्नामलाई यांनी भाजपा सोडल्यानंतर ‘वी द लीडर्स’ या नवीन राजकीय व्यासपीठाची स्थापना केली. यावरून विरोधकांनी, अन्नामलाई हे भाजपाची ‘बी टीम’ म्हणून काम करत असून ही अमित शाह यांचीच रणनीती असल्याचा घणाघाती आरोप केला होता. या आरोपांचा खरपूस समाचार घेत अन्नामलाई म्हणाले, “मी भाजपाची ‘बी टीम’ आहे आणि शाह यांनी मला एका विशेष मोहिमेवर पाठवले आहे, हा विरोधकांचा संपूर्ण अपप्रचार आणि निव्वळ खोटा दावा आहे.”

“माझ्या दाव्याची शाह यांच्याकडेच शहानिशा करा”

अन्नामलाई यांनी भाजपा नेत्यांना थेट आव्हान देत म्हटले, “अमित शाह तमिळनाडू दौऱ्यावर येत आहेत. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शाह यांनाच थेट विचारावे की त्यांनी अन्नामलाई यांना दिल्लीत राष्ट्रीय भूमिकेची ऑफर दिली होती की नाही आणि मी ती नाकारून परत आलो की नाही.”

त्याचप्रमाणे, स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबत चाललेल्या चर्चांवर भाष्य करताना ते म्हणाले, “काही माजी सहकारी मी अमेरिका किंवा परदेशात निघून जाईन, अशा कंड्या पिकवत होते. पण जो माणूस दिल्लीला गेला नाही, तो अमेरिकेला कसा जाईल? मी इथेच तमिळनाडूत राहून माझ्या जनतेची सेवा करणार आहे.”

के. अन्नामलाईंनी भाजपा का सोडली?

तमिळनाडू भाजपचे नेतृत्व करताना अन्नामलाई यांनी सत्ताधारी पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. द्रविड राजकारणाच्या पारंपारिक चौकटीबाहेर जाऊन भाजपला स्वतंत्र ताकद म्हणून उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

मात्र, आगामी निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाचे धोरण आणि दिल्लीतील नेतृत्वाच्या ‘अति-केंद्रीकरण’ (Decision-making धोरणामुळे अन्नामलाई नाराज झाले. तमिळनाडूतील तरुणांना बदल हवा आहे, पण दिल्लीतील नेतृत्व स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्याऐवजी सर्व निर्णय स्वतःकडेच ठेवते, या कारणास्तव त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याचे स्पष्ट केले.

आता ‘वी द लीडर्स’ या संस्थेच्या माध्यमातून अन्नामलाई तमिळनाडूच्या राजकारणात आपली नवी राजकीय वाटचाल सुरू करत आहेत.