नवी दिल्ली : तमिळनाडूच्या राजकारणातील भाजपचे कर्तेधर्ते व माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मंगळवारी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले गेले असले तरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अण्णामलाईंना दिल्लीतच थांबवण्याची सूचना केली. त्यांची भाजपकडून मनधरणी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत ‘अण्णाद्रमुक’शी युती करण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतल्यानंतर कमालीचे नाराज झालेले अण्णामलाई यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी ‘अण्णाद्रमुक’मधून भाजपमध्ये आलेले नैनार नागेंद्रन यांना प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे अण्णामलाई यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रीय विचारांचा प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होत आहे. अण्णामलाईंनी भाजप सोडण्याबाबत पक्षश्रेष्ठींना कळवले होते.

भाजपशी कोणतेही शत्रुत्व न ठेवता सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी ते मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. अण्णामलाई यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन राजीनामा दिल्याचे समजते. नवीन यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर अण्णामलाईंचा निर्णय अंतिम मानला जात होता. मात्र,  अमित शहांची भेट घेतल्यानंतर अन्नामलाई यांना दिल्लीतच थांबण्याची सूचना शहांनी केल्याचे समजते. अण्णामलाई यांच्या नाराजीची कारणे समजून घेण्याचा आणि त्यांना पक्षात कायम ठेवण्याचा प्रयत्न शहांकडून केला जात असून प्रदेशाध्यक्ष नागेंद्रन यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे.

अण्णामलाईंनी भाजप न सोडता पक्षामध्येच त्यांना मोकळीक देऊन कार्यरत करण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते. अण्णामलाई यांनी संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्याशीही चर्चा केली. संघाच्या वतीनेही अण्णामलाईंची संवाद साधला गेल्याचीही चर्चा मंगळवारी राजकीय वर्तुळात रंगली होती. दिल्लीतील गाठीभेटींबाबत अण्णामलाई यांनी जाहीरपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र त्यांना अपेक्षित तडजोड होण्याबाबत पुढील एक-दोन दिवसांत चित्र स्पष्ट होऊ शकते. अण्णामलाई यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्याची तयारीही पक्षाने केली होती. मात्र, हा प्रस्ताव त्यांनी फेटाळल्याचे सांगितले जाते.

भाजप व अण्णाद्रमुकची युती, विधानसभा निवडणुकांतील जागावाटप, उमेदवार निवडीबाबत मतभेद, तमिळनाडूमध्ये भाजपने स्वतंत्रपणे संघटनेचा विस्तार करावा असा अण्णामलाई यांचा आग्रह, राज्यातील आगामी रणनीतीबाबत प्रदेश नेतृत्वाशी मतभेद अशा अनेक कारणांमुळे अण्णामलाई नाराज झाले आहेत. गेल्या काही वर्षांत भाजपचा स्वतंत्र जनाधार निर्माण करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले होते. त्यामुळे आघाडीच्या राजकारणापेक्षा स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी असे अण्णामलाईंचे म्हणणे होते. त्याकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दुर्लक्ष केले होते.

नव्या पक्षाच्या तयारीची चर्चा

अण्णामलाई तामिळनाडू-केंद्रीत नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. हा पक्ष प्रादेशिक असला तरी फक्त द्रविडी राजकारण न करता राष्ट्रीय विचारांचा असेल अशी चर्चा होत आहे. नवा पक्ष स्थापन करण्यापूर्वी सामाजिक संघटना किंवा जनआंदोलनाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याचाही ते विचार करत असल्याचे सांगितले जाते.