भाजपाचे तमिळनाडूतील धडाडीचे नेते आणि माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाईं यांनी अखेर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांचा हा राजीनामा स्वीकारला आहे. भाजपाने तमिळनाडू माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाईं यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मंजूर करण्या आल्याचे अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसंस्थेने प्रसिध्द केले आहे.

दिल्लीतील बैठकीत मनवण्याचे प्रयत्न अपयशी

राजीनामा देण्यापूर्वी मंगळवारी दिल्लीत अण्णामलाईं यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली होती. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. अगदी ते दिल्ली विमानतळाकडे निघाले असतानाही त्यांना पुन्हा चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, अण्णामलाई आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पक्षातील सूत्रांनुसार, हा दौरा केवळ पक्ष नेतृत्वाचे आभार मानण्यासाठी होता.

अण्णामलाई यांच्या दोन अटी काय होत्या?

अन्नामलाई यांनी भाजपा हाय कमांडसमोर दोन पर्याय ठेवले होते. त्यात तमिळनाडू भाजपाचे अध्यक्षपद पुन्हा द्यावे आणि पुढील ७ वर्षांसाठी पूर्ण स्वायत्तता द्यावी. दुसरा पर्याय त्यांना स्वतःचा वेगळा राजकीय मार्ग निवडण्याची परवानगी द्यावी. भाजपाने पहिली अट अमान्य केल्याने त्यांनी पक्षाला निरोप देण्याचा निर्णय घेतला.

 BJP Press release
BJP Press release

तामिळनाडूत नवा प्रादेशिक पक्ष काढणार

अण्णामलाई आता तमिळनाडूमध्ये स्वतःचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करत आहेत. तमिळनाडूत सध्या राष्ट्रीय पक्षाला थेट मुख्य प्रवाहात येणे कठीण आहे, त्यामुळे सर्व घटकांना एकत्र घेऊन जाणारा प्रादेशिक पक्ष हाच सक्षम पर्याय ठरू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर के. अण्णामलाई म्हणाले, “आज आम्ही एक चळवळ सुरू करणार आहोत. आमचा राजकीय पक्ष तामिळनाडूतील पुढील विधानसभा निवडणूक लढवेल.”

तमिळनाडूतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही प्रमुख द्रविडीयन पक्षांना मोठा धक्का बसला आहे. तर जोसेफ विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळवून काँग्रेस व इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. नुकतीच विजय यांनी तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या बदलत्या राजकीय वातावरणात अण्णामलाई यांना स्वतःसाठी मोठी संधी दिसत आहे. आपल्या पुढील रणनीतीबाबत ते आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.