तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले होते. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ९५ जण ठार झाले होते, तर किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चांगलेच संतपाल्याचं पहायला मिळत होते. त्यानंतर काबूल विमानतळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात दहा नागरिक मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेनेही ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे आणि त्यासाठी माफी मागितली आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये २९ ऑगस्ट रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यात सात मुलांसह १० निष्पाप नागरिक मारले गेले. ते इस्लामिक स्टेटच्या खुरासान मॉडेलने म्हणजेच आयएसआयएस केशी जोडले गेले नव्हते आणि त्यांचा अमेरिकन सैन्याला धोका नव्हता अशी कबुली अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने पेंटागॉनने शुक्रवारी दिली.

काबूल विमानतळ हल्ला : “आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि…”; संतापलेल्या बायडेन यांचा हल्लेखोरांना इशारा

अमेरिकेने काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असं अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले होते. यासंदर्भातील माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने दिली होती. काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले होते.

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी शुक्रवारी काबूलमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्याबद्दल माफी मागितली ज्यामध्ये दहा जणांचा बळी गेला होता. ऑस्टिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ड्रोन हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही दिलगीर आहोत आणि आम्ही या भयंकर चुकीतून शिकण्याचा प्रयत्न करू.”

मृतांमध्ये दोन वर्षाच्या मुलीचा समावेश

तर पेंटागॉनमधील जनरल केनेथ मॅकेन्झी यांनीही ही एक चूक होती आणि मी मनापासून माफी मागतो असे म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने केलेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की अमेरिकेच्या हल्ल्यात सात मुलांसह एक निष्पाप मदत करणारी व्यक्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात ठार झालेली सर्वात लहान मुलगी सुमाया फक्त दोन वर्षांची होती. सुरक्षा दलांनी त्यांच्या कारमध्ये ज्या गोष्टी पाहिल्या ती स्फोटकं नसून पाण्याचे कंटेनर होते असे तपासात सांगण्यात आले आहे.

आठ तास केला कारचा पाठलाग

इस्लामिक स्टेट-खोरासन दहशतवादी गटाशी जोडलेल्या परिसरामध्ये ती व्यक्ती दिसल्यानंतर अमेरिकन गुप्तचरांनी त्या व्यक्तीची कार आठ तास ट्रॅक केली होती असे पेंटागॉनने म्हटले आहे. या कारची रचना ही काबूल विमानतळावर हल्ला करण्याऱ्या दहशतवादी गटाने वापरलेल्या कारसारखी असल्याची माहिती गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीशी साम्य दर्शवणारी होती असे तपासात आढळून आले.

विमानतळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर मदत करणाऱ्या जमारी अकमाधी यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. ड्रोन स्ट्राईक नंतर कारमध्ये दुसरा मोठा स्फोट झाला, जो स्फोटके भरलेली असल्याने झाल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितले होते. पण  तपासात असे दिसून आले की हा स्फोट बहुधा प्रोपेन टॅंकमुळे झाला होता. पीडितांच्या नातेवाईकांनी सांगितले की त्यांनी अमेरिकेत जाण्यासाठी अर्ज केला होता आणि ते विमानतळावर जाण्यासाठी फोन वाट पाहत होते.