कच्चा बदाम फेम अंजली अरोरा हिचा बॉयफ्रेंड आकाश संसनवाल याला उत्तर प्रदेशातील मेरठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या स्कॉर्पिओ कारवर भारतीय संसदेच्या माजी खासदाराचे बनावट स्टिकर लावल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली. टोल प्लाझावर पोलिसांनी त्याला थांबवले, त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दि फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आकाशला दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवरील काशी टोल प्लाझा येथे अटक करण्यात आली. त्याच्या स्कॉर्पिओवर माजी खासदाराचे बनावट स्टिकर आढळले. जेव्हा आकाशला ताब्यात घेण्यात आले तेव्हा अंजलीने दिल्लीतील अनेक राजकीय नेत्यांना फोन करून त्याच्या सुटकेसाठी मदत मागितली. त्याची स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली आहे आणि त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशला अटक केल्यानंतर पोलिसांना अनेक फोन आले आणि त्याला सोडण्याकरता शिफारसी देखील केल्या, परंतु पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बनावट व्हीव्हीआयपी पास वापरणाऱ्यांवर, ते कोणीही असोत, कठोर कारवाई सुरूच राहील. 

Award Banner

आणखी चार जणांना अटक

आकाश व्यतिरिक्त, अशाच प्रकरणात आणखी चार जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. रविवारी ब्रह्मपुरीच्या सीओ सौम्या अस्थाना आणि एसपी सिटी आयुष विक्रम सिंह हे पोलिस पथकासह काशी टोलवर उपस्थित होते. एमपी स्टिकर असलेल्या वाहनांना थांबण्यास सांगितले असता, चालकांनी अडथळे तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी दोन स्कॉर्पिओ आणि दोन थार यशस्वीरित्या रोखले.

आकाश संसनवाल कोण आहे?

आकाश संसनवाल हा व्यवसायाने डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे. त्याचे अधिकृत इन्स्टाग्राम हँडल @akash.sansanwal आहे आणि त्याचे तब्बल ७९.२ हजार फॉलोअर्स आहेत. त्याने अंजलीबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. कंटेंट क्रिएटर असण्यासोबतच, आकाश राजकारणातही सहभागी असल्याचे दिसून येते. तो आकाश संसनवाल भाजप नावाचे भाजप पेज हाताळतो. तो दिल्लीतील मेहरौली येथील भाजप ओबीसी मोर्चाचा उपाध्यक्ष आहे.