scorecardresearch

कैलास मानसरोवर यात्रेकरूंना मिळणार सात्विक जेवण

प्रवाशांची पेटपूजा होणार सोपी

कैलास मानसरोवर यात्रेकरूंना मिळणार सात्विक जेवण

कैलास मानसरोवर यात्रेला जाणा-या यात्रेकरूंना प्रतिकूल हवामानाविरोधात बराच संघर्ष करावा लागतो. याबरोबरच त्यांना यात्रेदरम्यान आपल्या अन्नाचीही मोठी तजवीज करावी लागते. यात्रेकरू जिथे मुक्कामासाठी थांबतात, तिथे तात्पुरते स्वयंपाकघर उभारले जाते. याठिकाणच्या हवामानात जेवण बनविणे हे मोठे आव्हान असते. त्यावर मात करत चालून थकल्यावरही जेवण बनविणे आणि मग जेवणे ही अतिशय नकोशी वाटणारी संकल्पना असते. पण पोटात आग पडल्याने त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नसतो. पण आतामात्र ही स्थिती बदलणार आहे. चीन, भारत आणि नेपाळ या तीन देशांमधील सहकार्यामुळे यापुढे कैलास मानसरोवर यात्रेला जाणा-या यात्रेकरूंना जम्मू येथील मधुबन फूड्सच्या माध्यमातून अगदी मध्यरात्रीही गरमागरम सात्विक जेवण उपलब्ध होणार आहे.

चीनच्या तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी दरवर्षी हजारो भारतीय नागरिक मोठ्या भक्तिभावाने जातात. पण तिथे त्यांची जेवणाची आबाळ होते. आता मात्र जम्मूतल्या मधुबन फूड्स या एकाच कंपनीला संपूर्ण कैलास यात्रेसाठी खाद्यपदार्थ पुरवण्याचं काम सोपवण्यात आल्यामुळे शिवभक्तांच्या तसेच पर्यटकांच्या पेटपूजेचा प्रश्न मिटणार आहे. नेपाळमधील असोसिएशन ऑफ कैलास टूर ऑपरेटर्स आणि मधुबन फूड्स यांच्यात करार झाला आहे. याविषयी कैलास टूरचे अध्यक्ष व एक्स्प्लोर कैलास ट्रेक्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश श्रेष्ठ व मधुबनचे व्यवस्थापकीय संचालक सुमित प्रताप गुप्ता यांनी पुढाकार घेतला आहे. यांच्यासोबत सहकार्याचा हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यात्रेकरूंना थांब्यावर पोचताच गरमागरम, आरोग्यदायी जेवण मिळेल, ते रात्री २ वाजता जरी तिथे पोचले तरी त्यांना गरमागरम जेवण मिळेल.”

मधुबन फूड्सचे सुमित प्रताप गुप्ता म्हणाले, “या यात्रेसाठीची सर्व कामे अतिशय खराब हवामानात व कठीण अशा भूभागांमध्ये करावी लागतात. किराणा सामान, भाज्या, फळे, प्रशिक्षित कर्मचारी, इंधन, भांडी, साहित्य व इतर सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी यात्रेसोबत खूप दुर्गम भागांमध्ये न्याव्या लागतात. पण आता यामुळे यात्रेकरुंचा त्रास वाचणार आहे. हे खाद्यपदार्थ सात्विक असतील याची काळजी घेतली जाणार आहे. कटरा, गुरुग्राम व शिर्डी येथील पवित्र स्वयंपाकघरांमध्ये जे सात्विक भोजनाचे नियम पाळले जातात ते सर्व नियम याठिकाणी काटेकोरपणे पाळले जाणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-07-2018 at 11:15 IST

संबंधित बातम्या