Kailash Vijayvargiya RSS Statement News: “केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी सांगण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे,” असे विधान मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे. मात्र, याच वेळी त्यांनी गर्दी वाढताना संघटनेतील मूल्यांचा ऱ्हास होणार नाही, याकडे संघाने लक्ष देण्याचा सूचक सल्लाही दिला.

भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना विजयवर्गीय यांनी हा जाहीर गौप्यस्फोट केला. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

“आमच्या सरकारमध्ये प्रत्येक अधिकारी सांगतो, मीही शाखेत गेलोय…”

मंत्री कैलाश विजयवर्गीय आपल्या भाषणात म्हणाले, “आजकाल कोणताही सरकारी अधिकारी जेव्हा आम्हाला भेटायला येतो, तेव्हा तो आवर्जून त्याच्या संघातील ओळखीचा उल्लेख करतो. ‘सर, मी शाजापूरला असताना माखनसिंगजी यांच्या शाखेत जायचो’, असे अधिकारी अभिमानाने सांगतात.”

पुढे बोलताना विजयवर्गीय म्हणाले, “आमचे सरकार आल्यापासून प्रत्येक जण संघाशी जोडला गेल्याचे दाखवत आहे. अनेक अधिकारी म्हणतात की, ‘मी सुद्धा संघाची पट्टी बांधली आहे, बेल्ट लावला आहे आणि खाकी हाफ पँटही घातली आहे.’ थोडक्यात सांगायचे तर, प्रत्येक अधिकारी आता स्वतःला संघाचाच एक भाग म्हणवून घेत आहे.”

‘शाखेचे अध्यक्ष’… अधिकाऱ्यांच्या दाव्यांवर विजयवर्गीयांची टोलेबाजी

काही अधिकारी तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा संबंध संघाशी कसा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. “एक अधिकारी मला म्हणाला की त्याचे वडील शाखेत जायचे. तर दुसरा म्हणाला, त्याचे वडील शाखेचे अध्यक्ष होते. वास्तविक पाहता, संघाच्या शाखेत ‘अध्यक्ष’ असे कोणतेही पदच नसते; पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने संघाशी असलेले नाते सांगण्याचा प्रयत्न करत असतो,” असा खोचक टोला विजयवर्गीय यांनी लगावला.

“गर्दी वाढली, पण गुणात्मक दर्जा कमी झाला”….विजयवर्गीयांचा घरचा आहेर

प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये संघाची ओळख सांगण्याची वाढती चढाओढ पाहता, विजयवर्गीय यांनी संघटनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. त्यांनी संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक दर्जा महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले.

“आज संघटनेत इतकी गर्दी झाली आहे की, त्या तुलनेत मूळ मूल्यांचे पालन करणारे लोक कमी होताना दिसत आहेत. संघटनेचा विस्तार होतोय, विचारसरणीही पसरतेय हे मान्य; पण जर माणसे योग्य नसतील, तर त्या विचारसरणीला काय अर्थ उरतो? हा आज आपल्या सर्वांसमोरील चिंतनाचा विषय आहे.” – कैलास विजयवर्गीय, नगरविकास मंत्री, मध्य प्रदेश

भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्याने थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलत्या भूमिकेवर आणि संघटनेतील वाढत्या ‘तथाकथित’ स्वयंसेवकांवर बोट ठेवल्यामुळे या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत.