Kailash Vijayvargiya Sugar Price Statement: मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपा आमदार कैलाश विजयवर्गीय यांनी बुधवारी साखरेच्या वाढलेल्या किमतींच्या पार्श्वभूमीवर अजब विधान केले. साखर अधिक महाग झाली पाहिजे आणि ४० वर्षांवरील लोकांनी साखरेचे सेवन पूर्णपणे बंद केले पाहिजे, असे वक्तव्य मंत्री विजयवर्गीय यांनी केले. सणासुदीच्या काळात वाढत्या साखरेच्या किमतींवरून विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असतानाच भाजपा मंत्र्याचे हे विधान चर्चेत आले आहे.

साखर खूप महाग व्हायला पाहिजे – मंत्री कैलाश विजयवर्गीय

कैलाश विजयवर्गीय इंदूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. “मुलांना योग्य दरात दुकानांंमध्ये साखर मिळायला हवी पण, वृद्धांना साखर दिली गेली नाही पाहिजे”, असे कैलाश विजयवर्गीय म्हणाले. “मी असे म्हणतोय की साखर खूप महाग व्हायला पाहिजे. मुलांना केवळ राशन दुकानांवर स्वस्त दरात साखर मिळायला हवी, वृद्धांना अजिबात साखर दिली गेली नाही पाहिजे”, असे विजयवर्गीय पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

चाळीशीनंतर साखर सोडा; विजयवर्गीय यांचा सल्ला

स्वत: साखर, मिठाई खात नसल्याचे मंत्री विजयवर्गीय यांनी यावेळी बोलताना सांगितले. ९० टक्के लोकांना आता मिठाई खायला आवडत नाही असा दावाही त्यांनी केला. डॉक्टर विशेषत: आयुर्वेदाचा अभ्यास करणारे ४० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी साखर खाणे योग्य मानत नाहीत. “तुमचे वय ४० पेक्षा जास्त असेल तर कधीतरी गुळ खा पण साखर अजिबात खाऊ नका”, असा सल्ला मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी दिला. दरम्यान, मंत्री विजयवर्गीय यांच्या विधानावरुन काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसकडून टीका

मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी विजयवर्गीय यांच्यावर टीका केली. पटवारी यांनी भाजपा नेत्यांवर गरीब आणि मध्यम वर्गीय कुटंबातील नागरिकांचा चेष्टा केल्याचा आरोप केला. महागाईवर नियंत्रण मिळवू असे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आले पण आता अशाप्रकारची विधाने करुन गरीब आणि मध्यम वर्गीय कुटंबातील नागरिकांचा अवमान आणि मस्करी केली जात असल्याचा आरोप पटवारी यांनी केला. जनता येत्या निवडणुकीत भाजपाला योग्य उत्तर देईल, असा इशाराही पटवारींनी दिला.