पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा ही पश्चिम बंगालची झाली. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवलं असून आता पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निकालानंतर एका उमेदवाराची मोठी चर्चा सुरू झाली आहे. लोकांच्या घरी धुणं-भांडी आणि घरकाम करून महिन्याला फक्त २५०० रुपये कमवणाऱ्या कलिता मांझी या निवडणुकीत आमदार झाल्या आहेत. सध्या त्यांची मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कलिता मांझी नेमकं कोण आहेत आणि त्यांनी विधानसभेची निवडणूक कशी जिंकली? याबाबत माहिती जाणून घेऊयात.
कलिता मांझी यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवली?
भारतीय जनता पक्षाने कलिता मांझी यांना औसग्राम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत कलिता मांझी या निवडून येतील का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र, औसग्राम विधानसभा मतदारसंघातून त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
औसग्राम विधानसभा मतदारसंघ हा बोलपूर लोकसभा मतदारसंघात येतो. या निवडणुकीत भाजपाने कलिता मांझी यांना उमेदवारी दिली आणि लोकांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला. कलिता यांना तब्बल १ लाख ७ हजार ६९२ मते मिळाली असून त्यांनी टीएमसीच्या श्यामा प्रसन्न लोहार यांचा १२ हजार ५३५ मतांच्या फरकाने पराभव केला आहे.
कलिता मांझी या सर्व सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणही सोडावं लागलं होतं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या लोकांच्या घरी जाऊन धुणं-भांडी आणि घरकाम करायच्या. त्यांचे पती प्लंबर म्हणून काम करतात. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
कलिता मांझी यांचा विजय कसा झाला?
गेल्या दशकापासून कलिता मांझी या समाजकारण आणि राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला बूथ-स्तरावर पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर भाजपाने त्यांना २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र, तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर यावेळी भाजपा नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि यावेळी त्या निवडून आल्या.
दरम्यान, प्रतिज्ञापत्रानुसार, कलिता मांझी यांची एकूण मालमत्ता १,६१,२१६ रुपये एवढी आहे. त्यामध्ये बँक ठेवी आणि रोख रक्कम व काही एलआयसी पॉलिसींचा समावेश आहे. तसेच त्यांच्या पतीच्या मालकीची एक निवासी मालमत्ता आहे. कलिता मांझी यांच्या आमदार झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून त्यांचं कौतुक होत आहे.
