Kamal Haasan Letter to CEC Gyanesh Kumar : मतदार याद्यांच्या फेरतपासणी आणि ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान, अभिनेते आणि खासदार कमल हासन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना एक पत्र लिहिले आहे. निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आयुक्तांनी विरोधी पक्षाच्या खासदारांची भेट घ्यावी आणि त्यांच्या चिंता जाणून घ्याव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.

संसदेच्या संविधान भवनात भेट घेण्याचे आवाहन

कमल हासन यांनी ज्ञानेश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात, विरोधी खासदारांसोबत संसद परिसरातील संविधान भवनात बैठक घेण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोग हा प्रत्येक भारतीयाच्या मतदानाच्या अधिकाराचा मुख्य संरक्षक आहे, त्यामुळे जेव्हा या संस्थेवरील विश्वासाला तडे जातात, तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्वतः पुढे येऊन निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या शंका आणि चिंता दूर करणे गरजेचे असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. “संवाद साधून तातडीने सुधारात्मक कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असेही त्यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘एसआयआर’ प्रक्रियेवर केली चिंता व्यक्त

कमल हासन यांनी पत्रात ‘भारतीय निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास पुनर्स्थापित करण्याचे आवाहन’ या मुद्द्यावर भर दिला आहे. मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अतिशय घाईघाईने राबवली जात असल्याबाबत तसेच काही ठिकाणी त्याच्या अंमलबजावणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्याच्या आरोपांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

“ही मागणी कोणत्याही एका पक्षासाठी नाही”

ही विरोधी खासदारांची भेट घेण्याची मागणी केवळ एका राजकीय पक्षापुरती मर्यादित नसून, देशाच्या राष्ट्रीय हितासाठी केलेले एक प्रामाणिक आवाहन असल्याचे कमल हासन यांनी स्पष्ट केले आहे. लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी संवाद अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, ज्ञानेश कुमार यांनी विरोधी खासदारांसाठी संवादाचे दरवाजे खुले ठेवावेत, अशी विनंती त्यांनी केली.

संसदेपासून रस्त्यापर्यंत ‘इंडिया’ आघाडीचा विरोध

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार याद्यांच्या फेरतपासणीविरोधात ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा आणि इतर खासदारांनी आकाशवाणी भवनात तब्बल साडेआठ तास ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर बुधवारीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी पुन्हा रस्त्यावर उतरून निदर्शने केली. हे पाहता विरोधकांकडून दररोज आंदोलन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.