Kamal Haasan Statement on Kannad Language: तामिळ चित्रपटांसह अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलेला सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन त्याच्या एका विधानामुळे अडचणीत सापडला आहे. कमल हसननं त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी केलेल्या एका विधानामुळे वाद सुरू झाला असून त्यावरून कमल हासनचे चित्रपटच कर्नाटकमध्ये बंद करण्याचा इशारा काही कन्नडभाषिक आक्रमक संघटनांनी दिला आहे. या मुद्द्यावरून आता चर्चेला सुरुवात झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अभिनेता कमल हासनच्या ‘Thug Life’ या चित्रपटाचं सध्या शूटिंग चालू आहे. चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान कमल हासननं तामिळ भाषेशी असणारं आपलं नातं बोलण्यातून अधोरेखित केलं. ‘उईरे उरवे तमिळ’ असं म्हणत माझं आयुष्य आणि माझं कुटुंब तमिळ आहे, असं कमल हासन म्हणाला. इथपर्यंत सारंकाही ठीक होतं. पण यानंतर त्यानं केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे.

व्यासपीठावर उपस्थित असलेला कन्नड अभिनेता शिवराजकुमार याच्याकडे पाहून कमल हासन म्हणाला, “अभिनेता शिवराजकुमार म्हणजे दुसऱ्या राज्यात राहणारं माझं कुटुंबच आहे. तुमची भाषा तामिळमधूनच जन्माला आली आहे. त्यामुळे तुम्हीही त्याच गटात समाविष्ट होता”, असं कमल हासन म्हणाला. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

हेतू एक, पण अर्थ भलताच!

दरम्यान, कमल हासननं केलेलं हे विधान दोन भाषिक समूहांमधील सांस्कृतिक एकतेसाठी उद्देशून केलं असण्याची शक्यता असली, तरी त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. कन्नड भाषेसाठी आग्रही असणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिका या संघटनेनं कमल हासनला लक्ष्य केलं आहे.

“कमल हासन म्हणाले की तामिळ ही कन्नडपेक्षा चांगली आहे. आम्ही कमल हासन यांना इशारा देत आहोत. तुम्हाला कर्नाटकमध्ये चित्रपट चालवायचा आहे की नाही? तसं असेल, तर मग कन्नडचा अपमान करणं थांबवा. आज तुम्ही इथे होतात, पण पळून गेलात. आम्ही तुमच्या तोंडावर काळी शाई फासण्यासाठी तयार होतो. जर तुम्ही असेच कर्नाटक आणि कन्नड भाषिकांविरोधात बोलत राहिलात, तर तुमच्याविरोधात आंदोलन होईल. तुमच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल”, असा अशारा कर्नाटक रक्षण वेदिकेचे नेते प्रवीण शेट्टी यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटक भाजपाची टीका

दरम्यान, कमल हासन यांच्यावर कर्नाटक भाजपानेही ‘उद्धटपणाचा कळस’ म्हणत टीका केली आहे. “सर्व भाषांचा आदर करण्याची संस्कृती कलाकारांनी जपायला हवी. त्यांनी कन्नडसोबतच इतर अनेक भारतीय भाषांमध्ये काम केलं आहे. पण आता ते कन्नडचा अपमान करत आहेत”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे कर्नाटक अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली आहे.